आमणापूर रेल्वे स्थानकाचे स्थलांतर नको
By admin | Published: July 16, 2014 11:34 PM2014-07-16T23:34:59+5:302014-07-16T23:40:03+5:30
प्रवाशांची मागणी : कृती समितीचा आंदोलन करण्याचा इशारा
भिलवडी : पलूस तालुक्यातील बोरजाईनगर येथे असणारे आमणापूर रेल्वे स्थानक स्थलांतरित करून विठ्ठलवाडी येथे नेण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करीत, स्थलांतर प्रक्रिया रद्द न झाल्यास बोरजाईनगर रेल्वे स्टेशन कृती समितीच्यावतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तीस ते पस्तीस वर्षांपासून आमणापूर हद्दीतील बोरजाईनगर या ठिकाणी रेल्वे स्थानक आहे. आमणापूर बोरजाईनगर, धनगाव, येळावी, वाडी-वस्तीवरील नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी या स्थानकाची निर्मिती झाली. या ठिकाणी सकाळी ७ वाजता सातारा पॅसेंजर, ७.१५ वाजता कोल्हापूर पॅसेंजर, सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर, तर रात्री ७ वाजता सातारा पॅसेंजर थांबते. सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, पुणे येथे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अडीचशेवर आहे. हे स्टेशन आमणापूर—पलूस रस्त्यालगत असणाऱ्या विठ्ठलवाडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आमणापूर परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. या स्थानकाचे स्थलांतर न करता, आहे त्याच ठिकाणी स्थानकात रेल्वे प्रशासनाने सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. आमणापूर येथे महादेव काटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कृती समितीची बैठक झाली.
यावेळी आमणापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, बाबासाहेब शिंदे, सौ. पुष्पा विजय कदम, शंकर शेंडगे, प्रफुल्ल पटेल, गजानन माळी, शशिकांत कदम, तानाजी राडे, विजय राडे, संदीप दिवटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)