वैद्यकीय अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी आमाणापूर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:04+5:302021-05-06T04:28:04+5:30
भिलवडी : आमाणापूर (ता. पलूस) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा गटकुळ यांच्याविरोधात खोटी निनावी तक्रार देणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल ...
भिलवडी : आमाणापूर (ता. पलूस) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा गटकुळ यांच्याविरोधात खोटी निनावी तक्रार देणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करा, प्रशासनाने एका प्रामाणिक वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यास हजारो ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी यांनी दिला आहे.
आमणापूर (ता. पलूस) येथील आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा गटकूळ या आयुर्वेदिक दवाखान्यात पैसे घेऊन खासगी व्यवसाय करत असल्याचा तक्रारी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे आला होता. यासंदर्भाने पलूस तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी पवार यांनी चौकशीसाठी आमणापूर उपकेंद्रास भेट दिली. यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी डॉ. मनिषा गटकूळ यांच्या कामाचा लेखाजोखा सादर केला.
महापूर आणि कोरोना काळातील काम अतिशय उत्कृष्ट आहे. त्या अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत आहेत. आमणापूर, विठ्ठलवाडी, बोरजाईनगर, बुर्ली, अंकलखोप मळीभाग, धनगाव आदी रुग्ण प्राथमिक उपचारासाठी उपकेंद्रात येतात. त्यांच्या कामकाजावर सर्वसामान्य नागरिक समाधानी आहेत तरी काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक त्यांच्या सेवेत अडथळा आणण्यासाठी त्रास दिला जातो. सर्व आमणापूर ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी असून शासनाने डॉ. गटकूळ यांच्या विरोधातील तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. शासनाने निनावी अर्जाचा विचार करू नये, असे आवाहन सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी आमणापूरचे काँग्रेसचे सरचिटणीस वैभव उगळे, विठ्ठलवाडीचे सरपंच शरद उगळे, वसंतदादा कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, वसंतराव पवार, विनायक हेंद्रे, कुंडलिक पाटील, केशव गोरंबेकर, संग्राम पाटील, अभिजित तातुगडे, दत्ता काटवटे, आनंद राडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.