अमरसिंह देशमुख विधानसभा लढणारच आटपाडीत
By admin | Published: July 15, 2014 12:46 AM2014-07-15T00:46:59+5:302014-07-15T00:50:41+5:30
कार्यकर्त्यांचा मेळावा : राष्ट्रवादीने संधी दिली नाही तरी अपक्ष लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव
आटपाडी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याहस्ते दि. ९ आॅगस्ट रोजी आटपाडीत शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पक्षाने संधी दिली अथवा संधी दिली नाही तर अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविण्याचा अमरसिंह देशमुख यांच्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करणार, अशी माहिती माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिली. येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणीच्या पटांगणात देशमुख गटातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा आयोजित केला होता. यावेळी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख आणि संजयकाका देशमुख यांना धारेवर धरत जोरदार मते मांडली. अनेक पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येकवेळी तुम्ही कुणाला तरी पाठिंबा देता आणि त्या नेत्याचा प्रचार करायला सांगता. या विधानसभा निवडणुकीत जर तुम्ही उमेदवारी केली नाही, तर आम्ही तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचे काम करणार नाही. घरात बसू. तुम्ही सतत पाठिंबा दिल्याने आम्हाला खूप त्रास होतो, असा तक्रारींचा पाढा अनेकांनी वाचून, उमेदवारी करण्याचा आग्रह केला. यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, अंगावर सुई टोचवायला जागा उरली नाही, एवढा त्रास आपल्यालाही झालाय. आपण मैत्री खुल्या मनाने करतो. गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक झाली. गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील, माजी आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत मला यावेळच्या निवडणुकीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मी थेट यावेळी अमरसिंहांना उभे करणार असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी मतदारसंघात सर्वेक्षण करून निर्णय घेऊया, असे मत पुढे आले. यानंतर शरद पवार यांना भेटून आपण अंतिम निर्णय जाहीर करू. अमरसिंह देशमुख म्हणाले, कार्यकर्त्यांनी जेव्हा जेव्हा उमेदवारीचा आग्रह केला, तेव्हा प्रत्येकवेळी मी उमेदवारी केली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण आपला निर्णय जाहीर करू. यावेळी सभापती सौ. अलका भोसले, चंद्रकांत भोसले, सावंता पुसावळे, पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ माने, भागवत माळी, दिनेश देशमुख, श्रीरंग कदम, बळवंत मोरे, शाम खटावकर, महिपत पवार, विजयसिंह पाटील, रघुनाथ चोथे, दिलीप सवणे, नारायण चवरे, भाऊसाहेब गायकवाड, भगवान मोरे, बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)