मिरजेत १० पासून अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:08 PM2018-09-30T23:08:30+5:302018-09-30T23:08:34+5:30
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम पुरस्कार गायक पं. उपेंद्र भट व तबलावादक पं. विठ्ठल क्षीरसागर यांना व डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार तबलावादक डॉ. खुशबू मदनलाल यांना देण्यात येणार आहे. ‘ताकाहिरो आराई’ या जपानी कलाकाराचे संतुरवादन होणार आहे.
दि. १० ते १८ पर्यंत आयोजित अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात पं. राणू मुजूमदार यांचे बासरीवादन, पं. उपेंद्र भट, पं. अर्नब चटर्जी आभा पुरोहित यांचे गायन, डॉ. खुशबू मदनलाल यांचे तबलावादनासह दिग्गज कलाकार गायन-वादन व नीलिमा हिरवे नृत्य सादर करणार आहेत. दि. ११ रोजी मिरजेचे संगीतकार राम कदम पुरस्कार गायक पं. उपेंद्र भट व तबलवादक पं. विठ्ठल क्षीरसागर यांना माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. दि. १२ रोजी विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार महिला तबलावादक डॉ. खुशबू मदनलाल यांना धर्मादाय उपायुक्त सुवर्णा जोशी यांच्याहस्ते व उद्योजक जितेनभाई झवेरी यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. रोणू मुजूमदार यांच्या बासरीवादनाने संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम, डॉ. खुशबू मदनलाल यांचे सोलो तबला वादन, पं. अर्नब चटर्जी, कलकत्ता, आभा पुरोहित, पुणे, गायत्री जोशी, पुणे, अमिता गोखले, मुंबई, अनुरत्न रॉय, मुंबई, राजश्री भाटवडेकर, पुणे, मंगला जोशी, सांगली, पं. अलका देव, नाशिक, मीनल नातू, मुंबई, मंजिरी करवे, पुणे, कृष्णा मुखेडकर, बिदर, ऋषिकेश बोडस, मिरज यांचे शास्त्रीय गायन, नीलिमा हिरवे, पुणे यांचे कथ्थक नृत्य, उस्ताद छोटे रहिमत खान, गोवा यांचे सतारवादन, पं. सचिन पटवर्धन, इंदोर यांचे स्पॅनिश गिटारवादन, पं. सुधांशु कुलकर्णी यांचे सोलो हार्मोनियमवादन, कौस्तुभ देशपांडे व सहकाऱ्यांचा आनंदतरंग हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. संगीत रसिकांसाठी मेजवानी असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. १८ रोजी उद्योजक अरुण दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीत होणार आहे. मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले आहे.
जपानी कलाकार ताकाहिरो आराई यांचे संतुरवादन
मिरजेत १९५४ पासून सुरू असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, अबन मेस्त्री यांच्यासह आंतरराष्टÑीय कीर्तीचे देशातील दिग्गज कलाकार, गायक-वादकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. नवरात्र संगीत महोत्सवात गतवर्षी प्रथमच नॅश न्युबर्ट या परदेशी कलाकाराने बासरीवादन केले होते. यावर्षी या जपानी कलाकार ताकाहिरो आराई यांचे संतुरवादन होणार आहे.