आंबेडकरी तत्त्वज्ञान बंदिस्त नको
By Admin | Published: March 9, 2016 01:01 AM2016-03-09T01:01:45+5:302016-03-09T01:02:05+5:30
रमेश वरखडे : पी. व्ही. पी. महाविद्यालयात चर्चासत्र
कवठेमहांकाळ : आंबेडकर व आंबेडकरवाद ही खूप विस्तीर्ण विचारधारा आहे. समता, न्याय, बंधुता, उपयुक्तता ही लोकशाहीची मूल्ये जपणारी जागतिक स्तरावरची विचारधारा असल्याने देशातील सर्वच स्तरातील साहित्यिकांनी आंबेडकरी तत्त्वज्ञानाला मर्यादित चौकटीत कैद करू नये, असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखडे यांनी केले.
कवठेमहांकाळ येथील पी. व्ही. पी. महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आंबेडकरी साहित्याविषयी दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्या सत्रातील बीजभाषणात क्रिटिकल इनक्वायटीचे (नाशिक) डॉ. रमेश वरखडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पवार होते.
डॉ. आंबेडकरांना व त्यांच्या साहित्याला आजपर्यंत व्यापक दृष्टीने कोणत्याही साहित्यिकांकडून पाहिले गेले नाही. त्यांना कायमच दलितांच्या चौकटीत बसविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. आंबेडकरवाद हा जगाला उपयुक्त आहे. आंबेडकरी लेखकांनीही आता कात टाकली पाहिजे व डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा विस्ताराने अभ्यास करून मर्यादेच्या सीमा तोडणे गरजेचे असल्याचे वरखडे यांनी सांगितले.
हिंदू संस्कृतीला सबळ पर्याय उभारण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले व जुलमी प्रथांना ठोकरले. मात्र दलित साहित्यातून, लेखणीतून सयाजीराव गायकवाड दुर्लक्षित झाल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे विजयराव सगरे म्हणाले, समाजामध्ये माजलेली विषमता दूर करण्यासाठी व उपेक्षित, वंचित, दलितांना स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे जगणे देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची वाट धरली. तसेच वर्षानुवर्षे जातीवाद, धर्मवाद जोपासणारी मंडळीच आज सत्तेवर असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.
प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनी, सामाजिक परिस्थितीवर उपहासात्मक टीका केली. या चर्चासत्रावेळी पहिल्या व दुसऱ्या सत्रात आंबेडकरवादी साहित्यावर विविध अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले. मराठी कथेवर प्रा. जी. के. ऐनापुरे, डॉ. प्राची गुर्जरपाध्ये, डॉ. शोभा नाईक, प्रा. माधुरी देशमुख यांनीही शोधनिबंध सादर केले.
या चर्चासत्रप्रसंगी प्रा. अविनाश सप्रे, डॉ. नंदकुमार मोरे, संतोष कोळी, डॉ. शिवाजी पाटील, विशाल शिंदे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. मंगला वरखडे, संस्थेचे सचिव प्रा. जे. वाय. भोसले यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. आप्पासाहेब कोळेकर यांनी केले. (वार्ताहर)