Sangli: बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च
By संतोष भिसे | Published: September 11, 2023 07:02 PM2023-09-11T19:02:59+5:302023-09-11T19:03:42+5:30
प्रशासनाने फसविल्याचा आरोप
बेडग : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी येथील आंबेडकरी समाजाने सोमवारी पुन्हा मुंबईकडे लॉंग मार्चसाठी कूच केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथून मुंबईला पायी जाण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव गावातून सकाळी रवाना झाले.
दरम्यान, आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अधिकाऱ्यांची विनंती व आवाहन त्यांनी झुगारुन लावले. कमानीचा पेटलेला वाद तीन महिन्यांपासून धुमसतच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमीन शासनातर्फे उभी करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांनी त्याविरोधात भूमिका घेतली. गावात कोणत्याही महापुरुषाच्या नावे स्वागत कमान उभी करायची नाही असा ठराव केला. त्यामुळेही वाद पुन्हा पेटला आहे.
दोन महिन्यांपूर्वीही आंबेडकरी समाज बेडगमधून मुंबईकडे निघाला होता. पण मुंबईतील बैठकीत फडणवीस कमान पुन्ही उभी करण्याचे आणि संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुन्हे दाखल झाले, पण कमानीची पूर्तता होऊ शकली नाही. याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. कमानीएएवजी गावात मोठी अभ्यासिका उभी करु, पण लॉंग मार्च काढू नका असे ग्रामपंचायतीचे आवाहन आंदोलकांनी झुगारुन लावले आहे.
सोमवारी सकाळी सुमारे २५० ते ३०० महिला-पुरुष आंदोलक मार्चसाठी गावातून रवाना झाले. निळे झेंडे घेतलेले व निळ्या टोप्या घातलेले महिला व तरुण सहभागी झाले होते. स्वतंत्र वाहनातून निर्णायक आंदोलनाच्या तयारीने ते गावातून रवाना झाले आहेत. प्रशासनाने वेळोवेळी फसवणूक केली आहे, त्यामुळे कमान उभी राहत नाही, तोपर्यंत गावात येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. माणगाव येथे दुपारी तीन वाजता सभा आयोजित केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी तेथूनच मुंबईसाठी चालत रवाना होणार आहेत.
प्रशासनाचे आवाहन झिडकारले
आंबेडकरी समाज गाव सोडून जाताना पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संध्या जगताप, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांची विनंती व आवाहन मान्य केले नाही. माजी उपसरपंच सचिन पाटील, नंदकुमार शिंदे, परशुराम नागरगोजे, मनोज मुंडगनूर, शिवाप्पा आवटी, महेश कणसे, बाळासाहेब शिंदे आदींनीही समजाविण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.
प्रशासनाने फसविल्याचा आरोप
आंदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आरोप केला की, प्रशासनाने वेळोवेळी आमची फसवणूक केली. यापुढे कोणाशीही चर्चा करणार नाही. कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी समाजाची फसवणूक केली आहे.