सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांना पगाराची प्रतीक्षा, उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:08 PM2023-10-16T18:08:49+5:302023-10-16T18:09:33+5:30

सुशांत घोरपडे म्हैसाळ : गर्भवती महिला रुग्णांना सेवा देणाऱ्या १०२ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या ५९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहा ...

Ambulance drivers waiting for salary for six months | सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांना पगाराची प्रतीक्षा, उपासमारीची वेळ

सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांना पगाराची प्रतीक्षा, उपासमारीची वेळ

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : गर्भवती महिला रुग्णांना सेवा देणाऱ्या १०२ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या ५९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांपासून पगारच झाला नाही. चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.

गरीब रुग्णांवर उपचार व्हावेत, कोणीही पैशांअभावी उपचारापासून वंचित राहू नये, हा मुख्य उद्देश ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. १०२ रुग्णवाहिकांमधून गर्भवती महिलांना घरातून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणणे. प्रसूतीनंतर घरापर्यंत सोडणे. प्रसूतीनंतर पुढचे ४० दिवस नवजात बालकाला व आईला आरोग्य सेवा पुरविणे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना महिला सेवा देणे आदी कामे १०२ रुग्णवाहिकेचे चालक करतात.

मात्र, सहा ते सात महिन्यांपासून वाहनचालकांचा पगारच झाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कंत्राटी वाहनचालक संघटनेने जि.प.च्या मुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. तसेच ज्या कंपनीने चालक पुरवण्याचे कंत्राट घेतले आहे, त्यांनाही या कर्मचाऱ्याबद्दल गांभीर्य नसल्याचे दिसते.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून आज-उद्या असे कारण दिले जाते. तर कंत्राटदार कंपनी आरोग्य विभागाकडे बोट दाखवते. अशा कात्रीमध्ये वाहनचालक सापडले आहेत. पगार नसल्याचे पाच ते सहा चालकांनी काम बंद केले आहे. प्रशासन व कंत्राटदार यांच्यात समन्वय नसल्याने वाहनचालक भरडला जात आहे. त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लवकर पगार करावेत, अशी मागणी वाहनचालक करू लागले आहेत.


‘गेली १० वर्षे मी रुग्णवाहिकेवर काम करत आहे. वेळेत पगार नसल्याने जवळपास ५९ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. माझे वडील आजारी असूनही मी त्यांना दवाखान्यात दाखवू शकत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाही. जिल्हा प्रशासनाने तोडगा काढून तत्काळ पगार द्यावा. -सुनील काळे, अध्यक्ष, कंत्राटी वाहनचालक संघटना
 

जिल्हा परिषदेकडून बिल बनवून धनादेश ट्रेझरी विभागाकडे पाठवला आहे. आत्तापर्यंत पगार व्हायला हवे होते. ट्रेझरीकडून माहिती घेतली जाईल. -डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Ambulance drivers waiting for salary for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.