शहरात दररोज १०० रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:13+5:302021-04-28T04:28:13+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांची प्रकृती ऐनवेळी ...
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांची प्रकृती ऐनवेळी खालावल्यास त्यांना रुग्णालयात हलवावे लागते. त्यातच कोविड रुग्णालयातील बेडही फुल्ल झाले आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हेलपाटे मारत आहे. दररोज १०० हून अधिक रुग्णांना ॲडमिट करण्यासाठी धावाधाव होत आहे.
जिल्ह्यात दररोज ११०० कोरोना रुग्ण सापडत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून हा आकडा स्थिर आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वच कोविड रुग्णालये फुल्ल आहेत. अगदीच एखाद्या रुग्णालयात बेड शिल्लक असतो. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्याही अधिक आहे. अशातच या रुग्णांची प्रकृती खालावली, ऑक्सिजनची पातळी कमी झाली, तर रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेडची उपलब्धता विचारली जाते. त्यानंतर त्या रुग्णालयात रुग्णांना नेले असता, बेडच शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. मग सुरू होतात या रुग्णालयातून त्या रुग्णालयात अशा चकरा. तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर कुठे तरी बेड मिळतो. दिवसभरात १०० हून अधिक रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकांची भटकंती सुरू असते.
चौकट
दिवसभरात किती फिरावे लागते?
१. ५ ते ६ फेऱ्या झाल्या
कोरोना रुग्णांना घेऊन दिवसभरात पाच ते सहा फेऱ्या होतात. अनेक रुग्णालयांत ऐनवेळी बेड नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या रुग्णालयात फिरावे लागते. अनेकदा तपासणीसाठी दोन-दोन तास ताटकळत रुग्णालयातच थांबावे लागत आहे, असे काका अब्दागिरे यांनी सांगितले.
२. ४ ते ५ फेऱ्या झाल्या
कोविड रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे रुग्णवाहिका तासन् तास थांबून राहते. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची जुजबी व्यवस्था असते. परिणामी आमचाही जीव टांगणीला लागलेला असतो, असे विशाल शिंदे यांनी सांगितले.
३. कसरत करावी लागते.
ऑक्सिजनचे बेड उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनची पातळी वर-खाली आल्यानंतर रुग्णास ॲडमिट करूनच घेतले जात नाही. आम्हीही नातेवाईकांना सहकार्य करतो. रुग्णालयांचे नंबर देतो. चौकशी करण्यास सांगतो. आमच्यापरीनेही प्रयत्न करीत असतो, असे राजू शिंदे यांनी सांगितले.
चौकट
शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार केली जाणारी रुग्णालये एकूण बेड्सची संख्या उपलब्ध बेड्सची संख्या
मिरज शासकीय रुग्णालय : २३८ - १८
भारती हाॅस्पिटल : १५० - ६
वाॅन्लेस हाॅस्पिटल : ६० - १३
जिल्हा क्रीडा संकुल : १३६ - १
सिनर्जी हाॅस्पिटल : ९० - ०