जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित देशमुखांनी व्यक्त केली सद्भावना, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 11:38 AM2023-02-18T11:38:37+5:302023-02-18T11:39:07+5:30
देशमुख व पाटील कुटुंबांचे दोन पिढ्यांचे नाते आहे. ते जपण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी मी आलो
इस्लामपूर : तरुण उद्योजकांना एकत्रित करून एकमेकांच्या साहाय्याने व्यवसाय वाढविण्याची प्रतीक पाटील यांची संकल्पना कौतुकास्पद आणि या परिसरातील उद्योग व्यवसायाला मोठी चालना देणारी असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काढले. जे इस्लामपूर-सांगलीच्या मनात आहे, तेच लातूरकरांच्याही मनात आहे, या शब्दांत त्यांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सद्भावना व्यक्त केली.
इस्लामपूर येथे इस्लामपूर बिझनेस फोरमच्या एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आण्णासाहेब चकोते, प्रतीक पाटील, राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, जगात जे-जे चांगले आहे, ते आपल्या भागात आणण्याचे काम जयंत पाटील करीत आहेत. प्रतीक व राजवर्धन पाटील हे जागतिक पद्धतीने विचार करीत असले, तरी त्यांची कृती ही स्थानिक माणसांचे हित जपणारी आहे. देशमुख व पाटील कुटुंबांचे दोन पिढ्यांचे नाते आहे. ते जपण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी मी आलो आहे.
आ. पाटील म्हणाले, इस्लामपूर बिझनेस फोरमच्या एक्स्पो प्रदर्शनाने युवा उद्योजकांच्या व्यवसायास अधिक चालना मिळेल. भविष्यात फोरमच्या कामाची व्याप्ती वाढत राहील. अमित देशमुख धाडसी नेते आहेत. भविष्यात त्यांच्यावर काँग्रेस पक्षात नवी जबाबदारी मिळू शकते. त्यांना ४ साखर कारखाने चालविण्याचा अनुभव आहे.
चकोते म्हणाले, बाजारात काय मागणी आहे, याचा अभ्यास करून त्यास तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आणि शासनाने हातभार लावल्यास आपण चीनसारखी प्रगती करू शकतो.
प्रतीक पाटील म्हणाले, मी नव्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक चांगले-वाईट अनुभव आले. नव्या व्यावसायिकास पुढे जायचे असेल, तर त्यास चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे.
आयबीएफ ती गरज पूर्ण करीत आहे. दाेन वर्षांपूर्वी आम्ही ८ सदस्यांनी आयबीएफ सुरू केले. सध्या २०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. आमचा पूर्वीचा २७ लाखांचा व्यवसाय १२ कोटींवर गेला आहे.
फोरमचे भगतसिंह पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक उदय देसाई यांनी आभार मानले.
यावेळी शैलजादेवी पाटील, राजवर्धन पाटील, प्रा. शामराव पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, सुस्मिता जाधव, सर्जेराव यादव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, भीमराव पाटील, प्रा. डॉ. योजना शिंदे-पाटील, अलका माने, आयबीएफचे उपाध्यक्ष महेश ओसवाल उपस्थित होते.