सांगलीच्या लेकीनं करुन दाखवलं, ऊर्वी पाटीलकडून हिमालयातील हमतापास शिखर सर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:28 AM2019-06-12T07:28:30+5:302019-06-12T07:32:15+5:30
अवघड मोहीम यशस्वी : वयाच्या अकराव्या वर्षी ट्रेकिंगच्या विक्रमाची पुनरावृत्ती
सांगली : कधी मुसळधार पाऊस, कधी बर्फवृष्टी, कधी कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा, अशा प्रतिकूल परिस्थितीला आव्हान देत सांगलीच्या ऊर्वी अनिल पाटील या ११ वर्षीय चिमुरडीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४ हजार ४00 फुटावरील हमतापास शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात हे शिखर सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली आहे.
मूळची सांगलीची व सध्या गोव्यात वास्तव्यास असलेल्या ऊर्वीने गतवर्षी अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता. यंदाच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कॅम्पवरून ३ जून २0१९ रोजी झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक करण्यात आले. त्यानंतर ५ जूनपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. रुमसू ६ हजार १00 फुटावरचा बेस कँप असून पुढे चिक्का (८,१00 फूट), जुआरु (९,८00 फूट) आणि बालुका गेरा (१२,000 फूट) असे कॅम्प करत ऊर्वीने १४ हजार ४00 फुटावरील हमतापास सर केले. दिवसाला ७ ते ८ तासांचा डोंगर-दºया आणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसांत पूर्ण करताना तिच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागला होता.
तयारी उपयोगी आली : ऊर्वी पाटील
हिमालयातील हमतापास हा अवघड ट्रेक असल्याने मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धा तास योगा व खास जीम करायची. या ट्रेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे ऊर्वी म्हणाली.