Sangli: निंबवडेतील नंदीवाले समाजाचा पहिला वन अधिकारी; आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण, पण..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 06:05 PM2024-09-10T18:05:50+5:302024-09-10T18:09:39+5:30
लक्ष्मण सरगर आटपाडी : शिकण्याची उरी मोठी जिद्द असली की परिस्थिती कोठेच अडथळा ठरत नसल्याचे मूर्तिमंत उदाहरण आटपाडी तालुक्यातील ...
लक्ष्मण सरगर
आटपाडी : शिकण्याची उरी मोठी जिद्द असली की परिस्थिती कोठेच अडथळा ठरत नसल्याचे मूर्तिमंत उदाहरण आटपाडी तालुक्यातील निंबवडे गावचे सुपुत्र अमोल चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. गरिबीचे चटके सहन करत असतानाच शिक्षणाशिवाय आपल्याला कोणताच पर्याय नाही ही जिद्द बाळगून अमोलने स्पर्धा परीक्षेची तयार केली. अखेर त्याने जिद्दीने वन विभागामध्ये कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी हे पद मिळविलेच. याबद्दल आटपाडी तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.
अमोल यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले. आई-वडील हे आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फिरून भांडी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निंबवडे, माध्यमिक शिक्षण लोकमान्य हायस्कूल निंबवडे येथे केले. उच्च शिक्षणासाठी कऱ्हाड गाठले. उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. अतिशय मेहनतीने अभ्यासात सातत्य ठेवत आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.
प्रशासकीय नोकरीत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रदीर्घ काळानंतर अपयशाला लाथ मारून यशाचे शिखर त्यांनी आज पार केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा (वन विभाग) स्पर्धा परीक्षाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये त्यांनी ज्युनियर सांख्यिकी अधिकारी या पदाला गवसणी घातली. परिस्थिती कशीही असो यश हमखास मिळतं, मात्र जिवाचं रान करून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते हे अमोल करून दाखविले आहे.
यश पाहायला वडील हयात नाहीत
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी काळात गरीब परिस्थितीशी झुंज देत अमोलने यश मिळविले. दुर्देवाने अमोलचे हे यश पाहण्यासाठी आज त्याचे वडील नाहीत. दोन महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले. एक मोठा भाऊ असून त्याचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे. अमोल याच्या यशाची बातमी समजताच निंबवडे गावात नंदीवाले समाज, नातेवाइक, गावातील मित्रांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंद साजरा केला.
मनात जिद्द, चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करता येते. शिक्षण घेत असताना आपल्या परिस्थितीला न लाजता परिस्थितीचे भान असेल तर यश मिळते. आज मी अधिकारी झालो मात्र ते पाहण्यासाठी माझे वडील नाहीत ही खंत आहे. -अमोल चव्हाण