कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:16+5:302021-05-09T04:26:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शारीरिक सदृढता, विशेषत: श्वसन, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्राणायामची मात्रा उपयोगी ठरत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शारीरिक सदृढता, विशेषत: श्वसन, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्राणायामची मात्रा उपयोगी ठरत आहे. योग तज्ज्ञांच्या मते प्राणायामचा लाभ कोरोना रुग्णांना व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना काळात प्राणायामबाबत लोक अधिक जागृतही झाल्याचे दिसत आहेत.
केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्राणायामचे महत्त्व स्पष्ट झाले आहेत. त्याच्याकडील कल वाढला आहे. श्वसनसंस्था सुदृढ करताना फुप्फुसांची व अन्य अवयवांची कार्यक्षमता वाढविण्याचे काम, तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे काम यातून होते. प्राणायामचे अनेक प्रकार असले, तरी सोपे प्रकार करूनही त्याचा चांगला उपयोग या काळात केला जात आहे. कोरोना काळात प्राणायाम करण्यासह अन्य योगासनांबाबत लोक अधिक जागृत झाले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी प्राणायामच्या माध्यमातून होत असलेला लाभ अनुभवला आहे.
चौकट
प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात...
अनुलोम विलोम, दीर्घ प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम यातून श्वसनसंस्था सुदृढ होण्यासह फुप्फुस व अन्य अवयवांची कार्यक्षमता वाढते. कोरोना काळात प्राणायामचे महत्त्व वाढले आहे.
- बाळकृष्ण चिटणीस, योग तज्ज्ञ
चौकट
नियमित योगा करणारे म्हणतात...
नियमित योगामुळे शारीरिक कार्यक्षमता वाढते. कितीही कामाचा ताण असला, तरी उत्साह टिकून राहतो. श्वसनसंस्थेसह शारीरिक अवयव व नाडी यांस योगाचा फायदा होतो.
-डॉ.आनंद लिमये
कोट
प्राणायाममुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. फुप्फुसांच्या व नाडी शुद्धीकरणास तो उपयुक्त ठरतो. शारीरिक सक्षमतेबरोबरच सकारात्मक ऊर्जा यातून मिळते. त्याचा खूप फायदा मला झाला.
- स्मिता भोकरे
चौकट
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
अनुलोम-विलोम प्राणायाममुळे नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती केली जाते. याचा मुख्य गुणधर्म रक्तवाहिन्यांचे प्रसरण करणे हा आहे.
प्राणायाममुळे फ्री रॅडिकल्स तयार होऊन शरीरातील विषाणू मारले जातात. फुप्फुसे व रक्तवाहिन्या प्रसरण पावल्याने त्यांची कार्यक्षमता वाढते.
प्राणायाम रोज १०-२० मिनिटे केल्याने ऑक्सिजनची कमी कधीच भासणार नाही.