आमराईचा श्रमदानातून होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:47 PM2019-04-29T22:47:59+5:302019-04-29T22:48:06+5:30

सांगली : तब्बल १७३ वर्षांपूर्वी सांगलीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आमराई उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. येत्या ...

Amrai's work will be transformed into a change | आमराईचा श्रमदानातून होणार कायापालट

आमराईचा श्रमदानातून होणार कायापालट

Next

सांगली : तब्बल १७३ वर्षांपूर्वी सांगलीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आमराई उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. येत्या ४ मे रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत निसर्गप्रेमी कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नव्याने झाडांची लागवड व उद्यानाची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी केले आहे.
खेबूडकर म्हणाले की, आमराई उद्यानात मागील काही वर्षात महापालिकेतर्फे काही झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जात आहे. आमराईमधील जागेची उपलब्धता पाहता, त्याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्याचा मानस आहे. मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने येथे आॅक्सिजनचे प्रमाण जास्त आहे. उद्यानात सकाळी व सायंकाळी लोक फिरण्यासाठी व व्यायामासाठी येतात. तिथे आॅक्सिजनचे प्रमाण आणखी वाढवून आॅक्सिजन पार्क केल्यास, ते नागरिकांच्या आरोग्याला उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे उद्यानातील रिकाम्या जागी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रिकाम्या जागेत सुशोभिकरणाची झाडे लावल्यास एक सुंदर बगीचा पुन्हा तयार होईल.
याकरिता लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. येत्या ४ मे रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदानातून बाग स्वच्छता व वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेणार आहोत. या उपक्रमात उद्यानात रोज फिरायला येणारे नागरिक, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्यानाला १७३ वर्षे पूर्ण
आमराई उद्यान १८४६ मध्ये विकसित करण्यात आले. या उद्यानाला यंदा १७३ वर्षे पूर्ण होत आहेत. १९८५ मध्ये उद्यानातील झाडांची मोजदाद करण्यात आली होती. तेव्हा सव्वाशे जातींचे वृक्ष आमराईत होते. त्यामध्ये चिंच, गोरखचिंच, चंदन, मोहोगनी, टेंभुर्णी, बेलगामवट, केशिया, रिठा, चेंडूफूल, भद्रलता, राचण, खडशिरणी, कदंब, रुद्राक्ष, सोनचाफा, नागचाफा, नागकेशर, पांगारा, शिसम, अशोक अशा अनेक दुर्मिळ जातींच्या वृक्षांचा समावेश होता. पूर्वी आमराईत चंदनाचीही विपुल झाडे होती. कालांतराने हे वृक्ष कमी होत गेले. एक ‘बोटॅनिकल गार्डन’ म्हणून आमराई उद्यान विकसित करण्याइतपत गुणवत्ता या उद्यानात आहे, असे खेबूडकर म्हणाले.

Web Title: Amrai's work will be transformed into a change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.