अमृत भारत योजना: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानके विकसित होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:11 PM2023-08-03T16:11:05+5:302023-08-03T16:11:30+5:30
मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश नाही. कारण...
मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानक अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेने प्रवासी व प्रवासी संघटनांकडून सूचना मागविल्या आहेत.
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशात सुमारे १२०० स्थानकांच्या सुधारणांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मध्य रेल्वेने याअंतर्गत ७६ स्थानकांवर प्रवासी सुविधांसाठी सुधारणाचे नियोजन केले आहे. या स्थानकात आवश्यकतेनुसार अतिरिक्त पादचारी पूल, लिफ्ट व एस्केलेटर, रहदारी मजल्याची सुधारणा, प्रतीक्षागृह व शाैचालयांची सुधारणा, स्थानकाच्या दर्शनी भागाची सुधारणा, स्थानकांत प्रकाश व्यवस्था सुधारणा, विविध चिन्हे, रेल्वे इंडिकेटर बोर्ड व कोच इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत.
स्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये सुधारणा, प्लॅटफॉर्मवरील शेडचा विस्तार, यासह प्रवासी सुविधा देणे हा उद्देश आहे. अमृत भारत योजनेत पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, हातकणंगले, सातारा, वाठार, फलटण, तळेगाव, आकुर्डी, हडपसर, चिंचवड, बारामती, देहू रोड, केडगाव, उरळी, लोणंद ही स्थानके समाविष्ट आहेत. या स्थानकांवर आवश्यक सुविधांसाठी प्रवाशांनी दि. १५ ऑगस्टपर्यंत सूचना देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
प्रवासी, प्रवासी संघटना, तसेच रेल्वेच्या विविध सेवा प्रदात्यांकडून स्थानकात आवश्यकतांबद्दल समावेशक दृष्टिकोन असलेल्या सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे.
मिरज स्वतंत्रपणे विकसित हाेणार
अमृत भारत योजनेत मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश नाही. मिरज माॅडेल स्थानक म्हणून घोषित झाले आहे. यामुळे पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरज स्थानक स्वतंत्रपणे विकसित करण्यात येणार आहे.