स्टिंग ऑपरेशन: कुणी स्टॅम्प देता का हो स्टॅम्प?, हताश सांगलीकरांचा सवाल
By अविनाश कोळी | Published: December 3, 2024 01:15 PM2024-12-03T13:15:20+5:302024-12-03T13:15:54+5:30
कृत्रिम टंचाई करुन जादा पैसे उकळण्याचा फंडा
अविनाश कोळी
सांगली : शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही जास्त रक्कम घेण्यासाठी काही विक्रेत्यांकडून स्टॅम्पचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. सातत्याने या गोष्टींचा सामना नागरिकांना करावा लागत असून सांगली शहरातील तुटवड्यामुळे आसपासच्या गावांमध्ये नागरिकांना धाव घ्यावी लागत आहे. ही बाब ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आली.
न्यायालय, महसूल आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी तसेच शेतकऱ्यांनाही जमिनीचे व्यवहार, खरेदीखत, बक्षिसपत्रे या शेतीच्या कामांसाठी स्टॅम्प पेपर लागतात. यात या सर्व गरजवंतांची फसवणूक होत आहे. एकीकडे मुद्रांक विभागाकडून मुद्रांकाचा सुरळीत पुरवठा सुरू असताना विक्रेत्यांकडून नकारघंटा वाजविली जाते. सध्या शहरात अनेक सदनिकांच्या खरेदी-विक्रीसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहेत.
परिणामी, शहरात मुद्रांकाचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा गैरफायदा घेत काही विक्रेते मुद्रांकाची चढ्या दराने विक्री करून घेत असल्याचे दिसत आहे. सेतू सुविधा केंद्रांसमोर असलेल्या मुद्रांक विक्रीच्या स्टॉलजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला चौकशीआधीच स्टॅम्प संपल्याचे बजावले जाते.
स्टिंग ऑपरेशनमध्ये काय दिसून आले
वेळ ५.०१, स्थळ : राजवाडा, सांगली
एका विक्रेत्याकडे आमच्या प्रतिनिधीने पाचशेच्या मुद्रांकाची चौकशी केली. त्याने सांगितले, गेल्या आठ दिवसांपासून स्टॅम्प आलेच नाहीत.
वेळ ५.०५
चौकशीनंतर एका विक्रेत्याने स्टॅम्प पेपर चार दिवसांपासून उपलब्ध नसल्याचे कारण दिले
वेळ ५.१०
एका विक्रेत्याने आताच स्टॅम्प संपल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.
मुद्रांकाच्या रकमेनुसार जादा आकारणी
शहरातील मुद्रांक विक्रेत्याकडे असलेल्या ५०० रुपयांच्या मुद्रांकासाठी ५५० रुपये मोजावे लागत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. यापूर्वीही जेव्हा शंभर रुपयांचा मुद्रांक सुरू होता तेव्हा त्यासाठी ११० रुपये आकारणी केली जात होती.
तीन टक्के कमिशन, मग जास्तीचे पैसे कशासाठी?
शहरात २५ हून अधिकृत मुद्रांक विक्रेते आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून या विक्रेत्यांना मागणीप्रमाणे सरकारी चलन भरून रक्कम अदा केल्यानंतर मुद्रांक दिले जातात.
प्रामुख्याने शासकीय मुद्रांकाचे ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल असे दोन प्रकार पडतात.
प्रत्येक मुद्रांकामागे विक्रेत्यास २ ते ३ टक्के कमिशन मिळत असते; मात्र, मुद्रांकासाठी जास्तीचे पैसे का आकारले जातात, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
..तर संबंधितांवर कारवाई करू
सांगलीत मुद्रांकाचा पुरवठा सुरळीत आहे. कोणतीही अडचण नाही. नागरिकांना स्टॅम्पची उपलब्धता केली जात नसेल, तर कृत्रिम तुटवडा निदर्शनास आल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुद्रांकाच्या रकमेपेक्षा जादा रक्कम आकारता येत नाही, तसा प्रकार दिसून आल्यास त्याबाबतही कारवाई केली जाईल. - अश्विनी सोनवणे-जिरंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली