Sangli News: शिवप्रेमींचा गनिमी कावा, आष्ट्यात रात्रीत उभारला शिवरायांचा अश्वारुढ पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:59 PM2023-01-04T13:59:51+5:302023-01-04T14:00:17+5:30
परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप
आष्टा : येथील छत्रपती शिवाजी चौकात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने व सहकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसवला. सकाळी हा प्रकार लक्षात येताच शहरासह परिसरात खळबळ उडाली.
आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा, यासाठी माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या आकस्मित निधनानंतर प्राचार्य विशाल शिंदे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र, अद्याप पुतळ्याचे काम सुरू न झाल्याने शिवसेनेचे पोपट भानुसे, सुधीर पाटील, मोहन पाटील, वीर कुदळे, अमोल पडळकर, दीपक आवटी यांच्यासह सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.
आंदोलनाला पुतळा समितीनेही पाठिंबा दिला हाेता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही धरणे आंदोलन केले. प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून पालिकेला बगीच्यासाठी दीड गुंठा जागा चार जानेवारीपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.
सोमवारी रात्री प्रवीण माने व सहकाऱ्यांनी गनिमी काव्याने शिवाजी चौकात चबुतरा तयार करून छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा बसवला.
याबाबतची माहिती मिळताच अतिरिक्त तहसीलदार धनश्री भांबुरे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलिस निरीक्षक अजित सिद, सहायक निरीक्षक मनमित राऊत, महेश गायकवाड, अण्णासाहेब बाबर, संजय सनदी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. उशिरापर्यंत प्रशासन व भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान संघर्ष समिती व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली.
पुतळ्याच्या उभारणीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना अचानक भाजप नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खळबळ उडाली होती.
परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप
भाजपने सोमवारी रात्री छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची माहिती समजतात शिवाजी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलिस व अर्ध सैनिक बलाची पथके आष्ट्यात दाखल झाली. यामुळे परिसराला पाेलिस छावणीचे रुप आले हाेते.