Sangli: खराब रस्त्यामुळे गेला माजी सैनिकाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 06:01 PM2024-08-17T18:01:55+5:302024-08-17T18:02:21+5:30
कुंभारमळा-मानेवस्ती रस्त्याची वाताहत, रस्त्याच्या प्रश्नावर निवडणुक झाली..पण रस्ता नाही झाला
कवठेमहांकाळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील माजी सैनिक बाबासाहेब लक्ष्मण माने (वय ७२) यांना कुंभारमळा ते माने वस्ती हा दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत नसल्याने आपले प्राण गमावावे लागले. घरातून बैलगाडीतून रस्त्यापर्यंत त्यांना आणले; परंतु रस्त्यापर्यंत येईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास घडला.
अग्रण धुळगावमधील माजी सैनिक बाबासाहेब माने यांनी भारतीय सैन्यात १८ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर १९८६ मध्ये ते सैन्यातून सेवामुक्त झाले. निवृत्तीनंतर ते शेती, घर बघत होते. गुरुवारी रात्री १०च्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. हृदयविकाराचा त्रास होत असताना माने यांना घरापर्यंत कोणतेही वाहन केवळ चांगला रस्ता नसल्याने पोहोचू शकत नसल्याने प्राण गमवावे लागले. उपचारासाठी त्यांना सांगली येथे खासगी रुग्णालयात दाखल करावयाचे होते.
दरम्यान बुधवारी सायंकाळी ४ च्या दरम्यान झालेल्या मोठ्या पावसाने कुंभारमळा ते माने वस्ती रस्त्याची वाताहत झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून त्यांना उपचारासाठी नेणे आव्हानात्मक बनले होते. एकीकडे माने यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कुटुंबाची झुंज सुरू होती आणि दुसरीकडे माने यांची हृदयविकाराचा त्रासातून मुक्त होण्यासाठी धडपड सुरू होती.
अग्रण धुळगावपासून कवठेमहांकाळ मार्गावर कुंभार मळा आहे. कुंभार मळ्यातून सुमारे दोन ते तीन किलाेमीटर अंतरावर माने वस्ती आहे. नागरिकांना पावसाळ्यात पायपीट करावी लागते, कारण रस्ता पुर्णपणे चिखलमय होतो.
रस्त्याच्या प्रश्नावर निवडणुक झाली.. पण रस्ता नाही झाला..
एक दोन वर्षांपूर्वी अग्रण धुळगावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांनी येथील मतदान मिळविण्यासाठी या रस्त्याचा प्रश्न अग्रस्थानी ठेवून मतदान मागितले होते. मात्र निवडणूक होऊन काही वर्षे पूर्ण झाली; पण या रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे.
अखेर घडलेही तसेच..
अग्रण धुळगाव येथील बाबासाहेब माने हे आपल्या शेतीवर व मायभूमीवर खूप प्रेम करीत होते. या रस्त्याच्या स्थितीला कंटाळून माने यांचे पुत्र दिनकर व बंधू विनोद कुटुंबासह दुसरीकडे राहण्यास गेले. वडिलांनीही आपल्याकडे यावे असा त्यांचा हट्ट हाेता. मात्र बाबासाहेब त्यांना म्हणाले ‘जीव गेला तरी चालेल; पण मी माझी शेती व मायभूमी सोडणार नाही’, अखेर घडलेही तसेच.