इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड, ट्रक पळवला; अज्ञात युवकाविरुद्ध लुटमारीचा गुन्हा
By श्रीनिवास नागे | Published: October 5, 2022 05:40 PM2022-10-05T17:40:28+5:302022-10-05T17:41:29+5:30
इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड आणि ट्रक पळवल्याची घटना घडली आहे.
इस्लामपूर (सांगली) : शहरातील सांगली रस्त्यावरील आष्टा नाका परिसरातील रिलायन्स पंपासमोर दुचाकी आडवी मारून एका २० वर्षीय युवकाने ट्रक मालकाशी असलेल्या आर्थिक वादातून चालकास मारहाण केली. त्याच्याकडील सहा हजारांची रोकड, मोबाईल हिसकावून घेत ट्रकसह त्याने पोबारा करत नऊ लाख रुपयांचा ऐवज पळवला. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. विश्वनाथ हरिश्चंद्र माळी (५२, खाटीक गल्ली, बाजारपेठ, चिपळूण, जि. रत्नागिरी) या ट्रक चालकाने पोलीसात रात्री उशीरा फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात युवकाविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चालक विश्वनाथ माळी हे ट्रक (एम एच-०८-एक्यू-२७२८) घेऊन सांगलीकडे निघाले होते. यावेळी इस्लामपूर जवळील आष्टा नाका परिसरात असणाऱ्या पंपाजवळ दुचाकी ट्रकच्या आडवी मारत अज्ञात युवकाने ट्रक थांबविला. चालकास 'तुझा मालक माझे पैसे द्यायचा आहे' असे म्हणत ट्रकमधीलच मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने माळी यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील सहा हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, वाहन चालविण्याचा परवाना जबरदस्तीने काढून घेत त्यांना ट्रकमधून खाली उतरण्यास भाग पाडत नऊ लाख रुपये किंमतीचा ट्रक घेऊन पलायन केले.