सांगलीत प्राध्यापिकेचा फ्लॅट फोडून चार लाखांचा ऐवज लंपास, विश्रामबागमधील घटना
By शरद जाधव | Published: October 11, 2022 07:06 PM2022-10-11T19:06:10+5:302022-10-11T19:06:45+5:30
सांगलीत प्राध्यापिकेचा फ्लॅट फोडून चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
सांगली: शहरातील विश्रामबाग परिसरात बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत ३ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी प्रा. अस्मिता संजय कोडग (रा. क्षितिज अपार्टमेंट, विकास चौक, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार 10 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेदहा ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी कोडग प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्या व कुटुंबातील इतर कामानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या.
नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी दिवसभराच्या कालावधीत बंद फ्लॅटचा सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला व आतील बेडरुम मधील लाकडी तिजोरी मधील ड्राव्हरमध्ये असलेले सोन्याचे दागिने व एक घड्याळ असा ३ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा माल लंपास करण्यात आला. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान त्या परत आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत.