प्रकल्पग्रस्तांसाठी नागनाथअण्णा महामंडळ, मंत्री अनिल पाटील यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:20 PM2024-09-27T18:20:45+5:302024-09-27T18:21:02+5:30
येत्या मंत्रिमंडळात मंजुरी
वाळवा : राज्यातील धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा आराखडा द्यावा. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.
राज्यातील प्रकल्प व धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांच्या उपस्थितीत मुंबईत गुरुवारी बैठक झाली. यावेळी वित्त विभाग सहसचिव विवेक दहिफळे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसंपदा विभागाचे प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी डॉ. नागनाथअण्णांच्या नावे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती गौरव नायकवडी यांनी दिली.