सांगलीतील इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी बालकाचा मृत्यू, प्रशासनाविरोधात संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:22 PM2023-01-24T16:22:08+5:302023-01-24T17:20:47+5:30
रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. मात्र, तरीही या मुलाला ताप येत होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हसनच्या मेंदूपर्यंत विकार बळावल्याचे सांगितले.
इस्लामपूर : शहरातील डंगरे गल्लीत भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हसन अर्शद डंगरे असे मृत मुलाचे नाव आहे. यामुळे पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
हसन डंगरे ८ जानेवारीला मदिना कॉलनीतील मामाकडे गेला होता. तेथे भटक्या कुत्र्यांनी त्याच्या उजव्या डोळ्याजवळ चावा घेतला होता. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे त्याला रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. मात्र, तरीही या मुलाला ताप येत होता. कऱ्हाड आणि सांगलीत उपचारासाठी आणल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हसनच्या मेंदूपर्यंत विकार बळावल्याचे सांगितले.
त्यामुळे त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात येत हाेते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. चाँदतारा मोहल्ला परिसरातही मुस्तफा शहाबुद्दीन जहागीरदार या पाच वर्षांच्या मुलाच्या मांडीला भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले होते.
शहराच्या विविध भागात भटक्या श्वानांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. नागरिकांनी संपर्क केला असता प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेचे आरोग्य अधिकारी अनिकेत हेंद्रे यांना निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
पालिकेतील अधिकारी आणि खातेप्रमुखांकडून चुकीचा कारभार सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून बेजबाबदारीचे वर्तन घडत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे रितसर तक्रार करणार आहे. - विक्रम पाटील, माजी नगरसेवक