Sangli: हयातीचा दाखला घेऊन आलेल्या वृद्धेचा 'मिरज तहसील' कार्यालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:13 PM2024-05-30T12:13:29+5:302024-05-30T12:14:05+5:30
श्रावणबाळ याेजनेची लाभार्थी : दाेन महिने दीड हजारांच्या अनुदानापासून वंचित
मिरज : मिरजेत तहसील कार्यालयात श्रावणबाळ पेन्शन योजनेसाठी हयातीचा दाखला जमा करण्यासाठी आलेल्या सखूबाई बनसोडे (वय ८१ रा. किल्ला भाग मिरज) या वृद्ध महिलेचा तहसील कार्यालयाच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी (दि. २९ ) दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला.
मिरज तालुक्यात निराधार, श्रावणबाळ व इतर शासकीय योजनांच्या सुमारे बारा हजार लाभार्थी महिला आहेत. श्रावणबाळ योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील वृद्ध महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळते. मात्र हे अनुदान मिळविण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात जिवंत असल्याचा दाखला संबंधित लाभार्थीने स्वत: देणे आवश्यक आहे. श्रावणबाळ योजनेची लाभार्थी असलेल्या सखूबाई यांना एप्रिल, मे महिन्याचे अनुदान मिळाले नव्हते. हयातीचा दाखला हजर केल्यानंतर जून महिन्यात तरी दीड हजारांचे अनुदान मिळेल, या आशेने सखूबाई बनसोडे बुधवारी दुपारी नातवासोबत तहसील कार्यालयात आल्या होत्या.
तहसील कार्यालयात आल्यानंतर काेणास काही कळण्यापूर्वी अचानक त्या खाली कोसळला. त्यांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी वृद्ध महिलांना पेन्शनसाठी नेहमीच ताटकळावे लागते. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या महिन्यात आधार कार्ड पडताळणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
शासकीय कार्यालयात विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दाखले व कागदपत्राच्या पूर्ततेसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने निराधार वृद्ध हतबल होतात. सखूबाई यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी सांगितले.