Sangli: कवलापुरात तरुणावर गोळीबार; दंडात गोळी घुसूनही कळलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:43 PM2024-01-31T12:43:34+5:302024-01-31T12:44:33+5:30
तरुण जखमी, हल्लेखाेराच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान
सांगली : शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळून प्रवास करताना कवलापूर (ता. मिरज) येथील तरुणावर अज्ञाताने गोळीबार केला. रत्नजीत विजय पाटील (वय २०, रा. होळीचा टेक, कवलापूर, ता. मिरज) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
दरम्यान, तरुणाच्या दंडाला जखम झाल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. मात्र, आपल्यावर गोळीबार झाला आहे, हेच त्याला कळले नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याच्या उजव्या हाताच्या दंडात गावठी बंदुकीची गोळी घुसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, नेमका गोळीबार कोणी केला, हे अद्याप समोर आले नाही. जखमी रत्नजीतवर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
कवलापूर येथील रत्नजीत पाटील हा मिरजेतील एका महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकण्यास आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून तो जुना बुधगाव रस्त्यावरून सांगलीकडे येत होता. रेल्वे फाटकापासून काही अंतरावर पुढे आल्यानंतर हाताला काहीतरी जखम झाल्याचे त्याला जाणवले. यानंतर त्याने दुचाकी थांबवून पाहिले असता, दंडातून रक्तस्राव सुरू होता. त्याने तातडीने एका मित्राला फोन करून दगड उडून लागल्याने आपल्याला जखम झाल्याची माहिती देत बोलावून घेतले.
यानंतर त्याला उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यावर त्याच्या दंडात गावठी बंदुकीतून उडालेली लहान गोळी घुसल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खासगी रुग्णालयात धाव घेतली. जखमी तरुणाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदुकीतून उडालेली गोळी लागल्याचे आपल्याला समजलेच नाही, असे त्याचे म्हणणे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
रत्नजीत ‘टार्गेट’ की अपघातच?
हाताला जखम होऊनही गोळी लागल्याचे रत्नजीत याला समजले नाही. यामुळे कोणी ‘टार्गेट’ करून त्याच्यावर गोळीबार केला की रेल्वे फाटक परिसरात अज्ञात व्यक्तीच्या हातातील बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने तो जखमी झाला, याचा आता पोलिस तपास करत आहेत.