कृष्णेतील पाण्यावर कर्नाटकात ऐनापूर सिंचन योजनेला सुरुवात
By admin | Published: July 21, 2016 11:40 PM2016-07-21T23:40:52+5:302016-07-22T00:03:21+5:30
सांगली जिल्हा वंचितच : सीमावर्तीय गावांना फायदा
सदानंद औंधे -- मिरज --कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी उचलण्यासाठी कर्नाटकात ऐनापूर जलसिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीमा भागातील लोकूर, मंगसुळी, केंपवाड, मदभावीसह १५ गावांत कालव्याद्वारे पाणी पोहोचले असून अनेक गावांतील तलाव भरण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात मात्र, कर्नाटकात वाहून जाणारे पाणी ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेद्वारे दुष्काळी भागात नेण्याबाबत केवळ चर्चा व ठरावच सुरू आहेत.
कर्नाटक सीमाभागात एप्रिल, मे महिन्यात नदीपात्र कोरडे पडल्याने कागवाड ते जमखंडीपर्यंत नदीकाठावरील शंभर गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने, नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांत नळपाणी योजना बंद पडल्या होत्या. पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. शिरोळजवळ राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने तीव्र पाणीटंचाई झाल्याने, वारणा व कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने ही परिस्थिती बदलली आहे. सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून जमखंडीजवळ सहा टीएमसी क्षमता असलेले कृष्णा नदीवरील हिप्परगी धरण पूर्ण भरले आहे.
कृष्णा नदीतून वाहणारे पाणी उचलण्यासाठी ऐनापूर येथील सिंचन योजना ५ जुलैपासूनच सुरू करण्यात आली असून, पाच पंपांद्वारे प्रति सेकंद ३०० क्युसेक पाणी उपसा करण्यात येत आहे. हे पाणी कालव्याद्वारे मदभावी, लोकूर, मंगसुळी, केंपवाडसह १५ गावांत पोहोचले आहे. मंगसुळी व मदभावी येथील तलाव भरण्यात येत आहेत. सीमा भागातील या अवर्षणग्रस्त गावांतील तलाव भरल्याने येथील पाणीटंचाई दूर होणार आहे. ऐनापूर योजनेची सिंचन क्षमता २७ हजार हेक्टर क्षेत्राची आहे.
वाहून जाणाऱ्या पाण्याचा पुरेपूर वापर करून लाभक्षेत्रातील गावांत पाणी सोडले जात आहे. मात्र सांगली जिल्ह्यात टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनेबाबत चर्चेचे गुऱ्हाळच सुरू असल्याने, कृष्णा नदीतून कर्नाटकात पाणी वाहून जात आहे.