गिरीलिंग डोंगरावर प्राचीन बौध्द लेणी
By Admin | Published: March 22, 2016 12:50 AM2016-03-22T00:50:26+5:302016-03-22T00:50:26+5:30
नव्याने शोध : मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना यश
मिरज : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील जुना पन्हाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीलिंग डोंगरावर सहा बौध्द लेण्यांचा शोध लागला आहे. यातून सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकण्यात मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना यश आले आहे.
राज्यात बौध्द-शैव-वैष्णव (हिंदू) आणि जैन अशा तीन प्रकारची लेणी आढळतात. दक्षिण महाराष्ट्रात सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात बौध्द लेणी आढळून आली होती. मात्र सांगली जिल्ह्यात बौध्द लेणी आढळून आली नव्हती. आता जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील जुना पन्हाळा या नावाने परिचित असणाऱ्या गिरीलिंग डोंगरावर सहा बौध्द लेण्यांचा शोध घेण्यात मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांना यश आले आहे.
मिरज व कवठेमहांकाळ या दोन तालुक्यांच्या सीमेवर जुना पन्हाळा डोंगर आहे. पश्चिमेकडील गिरीलिंग डोंगर व पूर्वेकडील गौसिध्द डोंगर पठार दोन भागात विभागले आहेत. प्राचीन लेखामध्ये या डोंगराचा उल्लेख ‘वुंद्रगिरी’ असा आहे. स्थानिक लोक याला ‘उंदरोबा’ म्हणतात. हे उंदरोबाचे ठिकाण म्हणजेच बौध्द लेणी आहेत.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक कुमठेकर व प्रा. काटकर यांनी दुर्लक्षित असणाऱ्या लेण्यांबाबत वर्षभर केलेल्या अभ्यासातून बौध्द, शैव व जैन लेण्यांचा समूह असणारी सहा लेणी आढळून आली आहेत. चैत्यगृह तसेच विहार या प्रकारातील ही लेणी आहेत. लेण्यांबरोबर पाण्याच्या टाक्याही आहेत. लेण्यांमध्ये कोरीव काम व कोणतेच शिल्पावशेष नाहीत. काही लेण्यांमधील शिल्पावशेष अन्यत्र हलविल्याचे दिसून आले आहे. या लेण्यांचा विकास तिसऱ्या ते पाचव्या शतकापासून यादव काळापर्यंत होत गेलेला दिसतो.
लेण्यांचा शोध घेण्यासाठी कुमठेकर व काटकर यांना मुफीद मुजावर, रणधीर मोरे, शरद जाधव व रवी हजारे यांंनी सहकार्य केले. (वार्ताहर)