...अन् कर्नाटकातील भक्ताला भेटला बिळाशीकरांमध्ये देव! हरविलेला सदाशिव सुखरूप घरी : प्रांतिक वादात झुळझुळला माणुसकीचा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:35 AM2017-12-29T00:35:55+5:302017-12-29T00:37:00+5:30
बिळाशी : तो देवाच्या भेटीला म्हणून कर्नाटकातून निघाला, पण रस्ता चुकला... अनोळखी मुलूख... भाषा अनोळखी... मेंदूवरचा ताबा ढिला झाला आणि तो सैरभैर झाला...
बाबासाहेब परीट ।
बिळाशी : तो देवाच्या भेटीला म्हणून कर्नाटकातून निघाला, पण रस्ता चुकला... अनोळखी मुलूख... भाषा अनोळखी... मेंदूवरचा ताबा ढिला झाला आणि तो सैरभैर झाला... अशा स्थितीत बिळाशी (ता. शिराळा, जि. सांगली) येथील ग्रामस्थांनी त्याला आसरा दिला आणि खºयाअर्थाने त्याला माणसातच देव भेटला.
सदाशिव श्रीकांत खळेमणी (वय ३५, रा. राजापूर, जि. गोकाक, कर्नाटक) जोतिबाच्या दर्शनासाठी म्हणून घरातून बाहेर पडला. पण देवदर्शन करून पुन्हा घरी परतलाच नाही. त्याचे मानसिक संतुलन बिघडले, तसा तो वाट दिसेल तिकडे धावू लागला. अनोळखी मुलूख, भाषा अपरिचित. कधी मुख्य, तर कधी आडवाटेने दिसेल त्या वाहनाला हात करू लागला.
काही तरुणांनी त्याला हटकले. तो बोलत नाही म्हटल्यावर त्याच्यावर हात टाकला. कपडे फाडले आणि त्याच्यावर खुळेपणाचा शिक्कामोर्तब झाला. अंगभर जखमा, डोळ्यात आसवे. मनात मरणाची भीती घेऊन चालता चालता तो बिळाशी येथील महादेव मंदिराजवळ आला. सकाळी आठच्या सुमारास तो सातपुते गुरुजींच्या परड्यात गेला. पाणी हवे म्हणून हातानेच खुणावू लागला.
कारण त्याला शब्दाची भाषा येत नव्हती. त्याला पाणी दिले. पाणी घटा घटा पिला. नंतर खाण्यासाठी चपाती—भाजी दिली. मग त्याच्या चेहºयावर थोडा तजेला आला. त्याची भाषा समजत नव्हती. पण तो कन्नड बोलतोय हे लक्षात आल्यावर कानडी भाषा समजत असलेल्या महासिध्द गुरुजींना बोलावण्यात आले. त्यांनी त्याला बोलते केले.
पोलिसांना कळवू का, विचारले. त्यावर तो ‘कळवा’ म्हणाला. मग तो नक्कीच चोर अथवा वेडा नाही, अशी खात्री झाली. त्याने गावाचे व जिल्ह्याचे नाव सांगितले, पण तेथे संपर्क होईना. त्यामुळे कोकरुड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पण पोलिसांनी मात्र जबाबदारी झटकून, तो वेडा आहे, तुम्हीच काय करायचे ते करा, असा सल्ला दिला. दरम्यान, ग्रामस्थांनी गोकाक पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. मात्र तेथे कोणी हरवल्याबाबतची नोंद नव्हती. पण गोकाक पोलिसांनी राजापूर येथील प्रतिष्ठित पुढाºयाला फोन लावून, विचारणा केली असता, सदाशिवबद्दल समजले.
दरम्यान, बिळाशीच्या ग्रामस्थांनी सदाशिवच्या राहण्याची व्यवस्था महादेवाच्या मंदिरात केली. कृष्णा फडतरे यांनी त्याला जर्किन दिले. पुजारी सरांनी रजई दिली. वैभव सातपुते, डी. वाय. सातपुते, बंडा कोळेकर यांनी कपडे दिले. कोणी तरी जेवणही आणून दिले. तो मंदिरात होता, पण त्याला माणसातच खरा देव दिसला. त्याने कपाळाला अबीर लावला आणि सर्वांच्या पाया पडला. त्याच्या घरच्यांशीही संपर्क झाला होता. घरचे लोक दुसºया दिवशी बिळाशीत पोहोचले. त्यांना पाहताच तो त्यांच्या गळ्यात पडला. हुंदके देऊन रडला. पण ते अश्रू आनंदाचे होते. माणुुसकीच्या जिवंतपणासाठीचे होते. ग्रामस्थांनी माणुसकीचा झरा वाहता ठेवला. धर्म, जात, पंथ आणि प्रांतीय वादाच्या रेषा कधीच जळून खाक झाल्या होत्या.
गोळ्या खाण्यास विसरला आणि...
राजापूर येथील सदाशिव श्रीकांत खळेमणी हा पाणस्थळ २६ एकर जमिनीचा मालक. परंतु त्याच्यावर मानसिक ताण असल्याने औषधोपचार सुरू होते. देवदर्शनासाठी निघताना तो गोळ्या खाण्यास विसरला आणि ८ ते १0 दिवस भरकटत राहिला. त्याच्या आईने मुलगा परत आला नाही म्हणून अंथरुण धरले होते. दीड वर्षाची लेक बापाच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. घरात स्मशानकळा, पत्नी अंगणवाडी सेविका, तीही हतबल झाली होती. सोशल मीडियाचा वापरही झाला. अखेर बिळाशीकरांच्या प्रयत्नाने तो सुखरूप घरी पोहोचला.
मानसिक असंतुलनातून बिळाशी (ता. शिराळा) येथे आलेल्या सदाशिव खळेमणी (कर्नाटक) याच्यासोबत डावीकडून आनंदा पेटकर, बंडा सातपुते, महेश खळेमणी, अधिक खळेमणी.