Sangli Election (15860) ...अन् क्षणात जल्लोषाच्या जागा बदलल्या-आघाडीकडे सन्नाटा : कोमेजलेल्या भाजप कार्यालयात जल्लोष फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:01 PM2018-08-03T22:01:55+5:302018-08-03T22:15:28+5:30
सत्तेचा तराजू ज्यावेळी कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडे झुकला होता, त्यावेळी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत रंगलेली दोन्ही पक्षांची कार्यालये तराजू भाजपकडे झुकल्यानंतर ओस पडली.
सांगली : सत्तेचा तराजू ज्यावेळी कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडे झुकला होता, त्यावेळी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत रंगलेली दोन्ही पक्षांची कार्यालये तराजू भाजपकडे झुकल्यानंतर ओस पडली. क्षणात जल्लोषाच्या जागा बदलल्या आणि ओस पडलेल्या भाजपची कार्यालये गुलालात न्हाऊन निघाली.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीच्या निकालाचे आकडे सकाळी सव्वादहा वाजल्यापासून हाती येण्यास सुरुवात झाली, त्यावेळी कॉँग्रेस-आघाडी पुढे होती. एकेक करीत पंधराचा आकडा आघाडीने गाठल्यानंतर दिवंगत नेते मदन पाटील यांच्या विजय बंगल्यासमोर जल्लोषास सुरुवात झाली. शेजारीच असलेल्या राष्टÑवादीच्या कार्यालयातही गुलालाची उधळण सुरू झाली. जल्लोष साजरा होत असतानाच, अचानक दुपारी दोन वाजल्यापासून भाजपने मुसंडी मारल्याची बातमी आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांना कळाली तसा जल्लोषाचा नूर बदलला. तीन तास विजयाचा आनंद लुटणाऱ्या दोन्ही कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर नाराजीचे पाणी पडले. हळूहळू करीत दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते नाराज होऊन परतू लागले. अवघ्या काही मिनिटातच विजय बंगला व राष्टÑवादी कार्यालयात सन्नाटा पसरला. सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती लागल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डोक्याला हात लावून बसलेले उमेदवार व कार्यकर्ते पाहावयास मिळाले.
दुसरीकडे सकाळपासून आघाडीच्या विजयाच्या आवाजाने कोमेजलेल्या भाजपच्या कार्यालयामध्ये दुपारी अडीचनंतर गर्दीला सुरुवात झाली. पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार आणि आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि विजयी घोषणांनी परिसर दणाणून गेला. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुलालात न्हाऊन गेले. संपूर्ण शहरभर सुसाट सुटलेल्या गाड्या आणि त्यावरील भाजपचे झेंडे महापालिकेतील सत्तेचा डंका पिटू लागले होते. काही क्षणात इकडचा जल्लोष तिकडे आणि तिकडचा सन्नाटा इकडे होताना सांगलीकरांनी पाहिला.
काय करायचं वाघाचं
भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देतानाच, विरोधी आघाडीच्या नेत्यांविरोधातही घोषणाबाजी केली. ‘आघाडीच्या वाघाचं आता काय करायचं’, ‘कोण म्हणतंय येत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘पुन्हा पार्सल परत’ अशाप्रकारच्या घोषणा त्यांनी दिल्या. सांगलीवाडीतील कार्यकर्त्यांनी दिनकर पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देतानाच जयंत पाटील यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.
विजयी उमेदवारांची निराशा
कॉँग्रेस-राष्टवादीचे विजयी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते नेत्यांच्या भेटीसाठी आतूर असतानाच सत्ता गेल्याची बातमी त्यांना कळाली, तेव्हा नेत्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात जमलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी परतणे पसंत केले.