...तर महापालिकेच्या भानगडीत पडणार नाही
By admin | Published: December 4, 2014 11:31 PM2014-12-04T23:31:04+5:302014-12-04T23:42:19+5:30
पतंगराव कदम : पालिकेबाबत समाधान नाही
सांगली : महापालिकेचा कारभार समाधानकारक नाही. आणखी एकदा बैठक घेऊन गटनेते व नगरसेवकांना मी ताकीद देईन. त्यानंतर पुन्हा असाच कारभार सुरू राहिला तर मी पुन्हा महापालिकेच्या भानगडीत पडणार नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, मोठ्या कष्टाने महापालिका निवडून आणलेली आहे. सत्ता आल्यानंतर सर्व नेत्यांनी मदन पाटील यांच्याकडे सर्वाधिकार दिले होते. वर्षभरातील कारभार काही समाधानकारक दिसत नाही. मदन पाटील कुठे आहेत, मला माहीत नाही. वास्तविक महापालिकेच्या कारभारावर नियंत्रण हवे. नागरिकांच्या हिताच्या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत. तसे होताना दिसत नाही. मिरजेतील इद्रिस नायकवडी यांनी मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला होता. ते विरोधात गेले असते तर चिठ्ठी टाकून सभापती निवडावा लागला असता. त्यामुळे माझ्या आग्रहाखातर त्यांनी या गोष्टी थांबविल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेस सदस्यांनी एकसंधपणे नागरिकांच्या हिताची कामे करावीत, अन्यथा मी पुन्हा महापालिकेत लक्ष घालणार नाही. कॉँग्रेसकडे सर्वाधिक सदस्यबळ असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा राहील. राष्ट्रवादी, भाजपचे काय संबंध आहेत, ते एकदा त्यांनी स्पष्ट तरी करावे. (प्रतिनिधी)