उघड्या आभाळाच्या छताखाली अंगणवाडीचा वर्ग
By admin | Published: June 26, 2015 11:02 PM2015-06-26T23:02:52+5:302015-06-27T00:22:53+5:30
महिन्यापूर्वी वाऱ्याने पत्रे उडाले : पंचायत समिती प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
आटपाडी : येथील गोंदिरा मळ्यातील अंगणवाडीचे पत्रे वाऱ्याने उडून जाऊन महिना उलटला. उघड्या आभाळाच्या छताखाली वाऱ्या-पावसात छोट्यांना बसायला निवाराही नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुरड्यांना अंगणवाडीला पाठविणेच बंद केले आहे. याकडे पंचायत समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.आटपाडीच्या दक्षिणेस गोंदिरा मळा आहे. त्याठिकाणी जि. प.ची १ ते ४ थी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. प्राथमिक शाळेसाठी दोन खोल्या आहेत. एका खोलीत दोन वर्गाची मुले बसत आहेत. दोन्ही खोल्यांच्या मध्ये अंगणवाडीची इमारत आहे. दि. १५ जुलै २०१० रोजी ही इमारत बांधण्यात आली. २ लाख ५१ हजार १७६ रूपये खर्चून स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, व्हरांड्यासह अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली. दि. २२ मे रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाने या भागात हजेरी लावली. त्यावेळी जोराच्या वाऱ्याने अंगणवाडीच्या इमारतीवरील सर्व पत्रे लोखंडी अॅँगलसह उडून गेले. पावसाने अंगणवाडीतील सर्व कागदपत्रे, दैनंदिनी भिजून गेली. खुर्च्या मोडल्या. लहान मुलांना देण्यासाठी आणलेला औषधांचा साठा खराब झाला. या अंगणवाडीत मासाळवाडी, गावडे वस्ती, सोलनकर वस्ती, पाटील वस्ती, मगर वस्ती या परिसरातील लहान मुले येतात. पण सध्या व्हरांड्यात, झाडाखालीच ती बसतात. (वार्ताहर)
आला, आला वारा...
जोराच्या वाऱ्याने उडून गेलेले पत्रे आता परिसरातील काही नागरिक एक-एक पळवून नेऊ लागले आहेत. दिवसेंदिवस पत्र्यांची संख्या कमी होऊ लागली असताना, आतापर्यंत पंचायत समितीचा एकही अधिकारी या अंगणवाडीकडे साधी चौकशी करण्यासाठीही फिरक लेला नाही. त्यामुळे येणाऱ्या २-३ मुलांना घेऊन अंगणवाडीतील कर्मचारी माळावरील जोराच्या वाऱ्याशी झुंज देत अंगणवाडी जपत आहेत.
खुर्च्या मोडल्या, मुलांसाठीची औषधेही भिजली
जोराच्या वाऱ्याने अंगणवाडीच्या इमारतीवरील सर्व पत्रे लोखंडी अॅँगलसह उडून गेले. पावसाने अंगणवाडीतील सर्व कागदपत्रे, दैनंदिनी भिजून गेली. खुर्च्या मोडल्या. लहान मुलांना देण्यासाठी आणलेला औषधांचा साठा खराब झाला. जोराच्या वाऱ्याने उडणाऱ्या धुळीने मुले आणि अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत. पालकांनी मुलांना अंगणवाडीत पाठविणेच बंद के ले आहे.