‘लाडक्या बहिणीं’च्या मदतीला आता येणार अंगणवाडी सेविका, अर्जातील त्रुटी तपासणार

By संतोष भिसे | Published: October 2, 2024 05:47 PM2024-10-02T17:47:49+5:302024-10-02T17:50:24+5:30

घरोघरी जाऊन तपासण्याची सूचना

Anganwadi sevaka will check the errors in the application or bank account of women under ladki bahin yojana | ‘लाडक्या बहिणीं’च्या मदतीला आता येणार अंगणवाडी सेविका, अर्जातील त्रुटी तपासणार

‘लाडक्या बहिणीं’च्या मदतीला आता येणार अंगणवाडी सेविका, अर्जातील त्रुटी तपासणार

संतोष भिसे

सांगली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ताही महिलांच्या बँक खात्यांवर जमा होऊ लागला आहे; पण अनेक महिलांना पहिला हप्ताही मिळालेला नाही. त्यांच्या मदतीसाठी आता अंगणवाडी सेविका येणार आहेत. शासनाने त्यासंदर्भात मंगळवारी सूचना केल्या.

जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत. पहिला हप्ता दोन महिन्यांचा म्हणजे ४५०० रुपये मिळाला. त्यानंतर आठवडाभरापासून १५०० रुपयांचा तिसरा हप्ता मिळू लागला आहे; पण एकही हप्ता न मिळालेल्या महिलांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या बँक खात्यांत त्रुटी आहेत. काहींचे अर्ज त्रुटींमुळे नामंजूर झाले आहेत किंवा मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. या महिलांच्या मदतीला अंगणवाडी सेविकांना पाठविण्यात येणार आहे. पैसे न मिळालेल्या महिलांची यादी शासनाकडून जिल्ह्याला पाठविण्यात येणार आहे. ती घेऊन अंगणवाडी सेविका संबंधित महिलेला भेटतील. त्यांच्या अर्जातील किंवा बँक खात्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करतील. त्यानंतर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र महिला योजनेत सामावून घेण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महिला व बालकल्याण विभागाला यासंदर्भात कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

२० टक्के महिलांना नाही मिळाले पैसे

सांगली जिल्ह्यात ७ लाख १३ हजार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी सुमारे २० टक्के महिलांच्या खात्यांवर आजअखेर पैसे जमा झालेले नाहीत. ‘शेजारच्या तसेच कुटुंबातील अन्य महिलांचे पैसे आले; पण माझे का नाही?’ याची चिंता या महिलांना लागून राहिली आहे. राज्यभरातही सुमारे २० टक्के महिलांच्या खात्यांवर पैसे जमा झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

का जमा होईनात पैसे?

अनेक महिलांच्या बँक खात्यांची केवायसी झालेली नाही. काही महिलांचे बँक खाते ‘आधार’शी लिंक नाही, बँक खाते आधार सीडिंग झालेले नाही. यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडचणी आल्या आहेत. योजनेसाठी भरलेला अर्ज मंजूर झाल्याचे संदेश या महिलांना महिला व बालकल्याण विभागाकडून मिळाले. त्यानुसार पैसेदेखील पाठविण्यात आले. सध्या ते बँकेतील खात्यापर्यंत येऊन अडकले आहेत. खात्याच्या तांत्रिक त्रुटी दूर होताच त्यात जमा होतील. पैसे परत जाणार नाहीत असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: Anganwadi sevaka will check the errors in the application or bank account of women under ladki bahin yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.