संविधानाबद्दलचा राग आता पोटातून ओठावर : आ. ह. साळुंखे -लोकशाही धोक्यात आल्याची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:16 AM2018-09-03T00:16:25+5:302018-09-03T00:16:33+5:30
नवी शिकलेली पिढी सलोखा, प्रेमभाव, बंधुभाव न ठेवता मनुवादी विचारांकडे वळत आहे. मनुवादी विचारांनी डोके वर काढल्यामुळे संविधानाचा पोटातला राग ओठावर आला आहे.
कवठेएकंद : नवी शिकलेली पिढी सलोखा, प्रेमभाव, बंधुभाव न ठेवता मनुवादी विचारांकडे वळत आहे. मनुवादी विचारांनी डोके वर काढल्यामुळे संविधानाचा पोटातला राग ओठावर आला आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.
शेतकरी कामगार, कष्टकरी जनतेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल आ. गणपतराव देशमुख यांना परिवर्तन परिक्रमा यांच्यातर्फे आ. ह. साळुंखे यांच्याहस्ते ताम्रपट प्रदान करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवर्तन परिक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव, हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार-पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड आदी उपस्थित होते.
आ. ह. साळुंखे म्हणाले, क्रांतीनंतर प्रतिक्रांती येत आहे. इतिहासातील आदर्शांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत न पोहोचल्याने हे सर्व घडत आहे. घटनेतील मूल्यांची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. आदर्शवत विचारांची बीजे जपून ठेवली पाहिजेत. बहुजनांच्या चळवळी फसत आहेत. वास्तव परिस्थिती अंधारून आल्यासारखी आहे. अशावेळी पुरोगामी विचारांचा प्रकाश गरजेचा आहे.
गणपतराव देशमुख यांचा गौरव म्हणजे वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठोबाची मनोभावे पूजा करावी, असा आहे. हा गौरव समाजासाठी प्रेरणादायी प्रकाश ठरणार आहे. आयुष्यातील तत्त्वांपासून क्षणभरही विचलित न होता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता दीर्घ आयुष्य तत्त्वाला महत्त्व देऊन सामाजिक व्रत गणपतरावांनी जपले आहे. त्यांचे हे कार्य भावी पिढीला माहिती झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना गणपतराव देशमुख म्हणाले, हा कार्यकर्त्यांचा सत्कार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पाणी योजना तयार केल्या, मात्र गेली दोन वर्षे भयानक दुष्काळ होता. पिके करपून जात असताना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई होती. केवळ वीज बिल कोणी भरायचे, म्हणून योजना बंद आहेत, ही शोकांतिका आहे. गेली पंचवीस वर्षे नागनाथ अण्णांच्याबरोबर शासनाशी संघर्ष केला. त्यामुळे तेरा दुष्काळी तालुक्यात आज पाणी आले. तरीही शेतीमालाला दर नाही, ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य हे प्रश्न नव्याने तयार होतच आहेत.
यावेळी शरद पाटील म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी ते ज्या घरात रहात होते, त्याच घरात आजही गणपतराव राहतात. आबा हे सोलापूर जिल्ह्याचे भागीरथ आहेत. संपतराव पवार, गौतमीपुत्र कांबळे, वैभव नायकवडी अरुणअण्णा लाड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तानाजी जाधव, आभार प्रा. बाबूराव लगारे यांनी मानले. कार्यक्रमास अॅड. के. डी. शिंदे, अॅड. अजित सूर्यवंशी, सरपंच राजश्री पावसे, चंद्रकांत देशमुख, प्रा. वैजनाथ महाजन आदी सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. बाबूराव गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
एक दिवस कष्टकºयांचे राज्य येईल!
गणपतराव देशमुख म्हणाले की, आज जरी देशात पुरोगामी चळवळीची पिछेहाट होताना दिसत असली तरी, घाबरून जाण्याचे कारण नाही. एकीकडे मनुवादी प्रवृत्ती वाढत असली तरी, देशात एक दिवस नक्की कष्टकरी लोकांचे राज्य येईल, हा माझा विश्वास आहे. क्रांतिसिंंह नाना पाटील यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यातील भागीदारीचा वारसा याठिकाणी आहे. त्यामुळे हा सत्कार माझ्यासाठी अधिक बळ देणारा आहे. आज देशाला आणि राज्याला पुरोगामी विचारांची खºया अर्थाने गरज आहे. त्यामुळे प्रतिगामी परिस्थितीतसुध्दा उत्साह कमी होत नाही. आज चित्र काहीही असले तरी, पुरोगामी विचारांचा विजय होणार आहे, असेही देशमुख म्हणाले.