सांगलीत दहशतवादी याकुब मेमनच्या उदात्तीकरणावर संताप
By अविनाश कोळी | Published: September 10, 2022 07:36 PM2022-09-10T19:36:17+5:302022-09-10T19:36:47+5:30
हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने : देशद्रोहाचा गुन्हा दाखलची मागणी
अविनाश कोळी
सांगली : दहशतवादी याकुब मेमनच्या थडग्याचे सुशोभीकरण करून उदात्तीकरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करा, अशी मागणी करीत शनिवारी सांगलीत हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली. सांगलीच्या मारुती चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजप, शिवसेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान, हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या व न्यायालयाने फाशीची शिक्षा दिलेल्या क्रूर दहशतवादी याकुब मेमनच्या थडग्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. संगमरवरी फरशीचा कट्टा बांधून, एलईडी लाइट लावून त्या ठिकाणी फुले वाहिली जात आहेत. दहशतवाद्याचे उदात्तीकरण करणाऱ्या देशद्रोही लोकांवर राष्ट्र राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा. त्यांना ताबडतोब अटक करावी. मेमन याचे थडगे जमीनदोस्त करावे. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवादी ओसामाबिन लादेन याचा मृतदेह अमेरिकेने समुद्रात फेकून दिला होता. त्याच पद्धतीने याकुब मेमनचा मृतदेह थडग्यातून काढून समुद्रात फेकून द्यावा, अशी मागणी शिवप्रताप मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.
यावेळी नितीन शिंदे, अविनाश मोहिते, रवी सावंत, भूषण गुरव, मोहन जामदार, संजय जाधव, प्रकाश चव्हाण, प्रदीप निकम, प्रसाद रिसवडे, प्रकाश निकम, बाळासाहेब मोहिते-पाटील, युवराज जाधव, संतोष शिंदे, मोहन श्रीधर मेस्त्री, अजय काकडे, पंकज कुबडे आदी उपस्थित होते.