साधूंना मारहाणप्रकरणी हिंदू जनजागृतीचा संताप, कारवाईची मागणी
By अविनाश कोळी | Published: September 14, 2022 09:03 PM2022-09-14T21:03:24+5:302022-09-14T21:04:33+5:30
कडक कारवाई करण्याची राज्य शासनाकडे मागणी
सांगली : मोरबगी-लवंगा (ता. जत) येथे चार हिंदू साधूंना स्थानिकांकडून बेदम मारहाणीच्या घटनेबाबत संताप व्यक्त करीत हिंदू जनजागृती समितीने याप्रकरणी तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदू साधूंना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जखम भरत नाही, तोच पुन्हा सांगली जिल्ह्यात यासारखीच घटना घडली. लवंगा गावात मथुरा (उत्तर प्रदेश) येथून गाडीतून आलेले जुना आखाड्याचे चार साधू पत्ता विचारत होते. तेव्हा ते लहान मुले पळवणारे आहेत, असा गैरसमज करून स्थानिक जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला.
साधुसंतांची भूमी म्हणावणाऱ्या महाराष्ट्रात साधुंना सतत होणाऱ्या मारहाणीमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे. निरपराध हिंदू साधूंना मारहाण होणे, ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.