अजित पवारांनी केली गद्दारी, सांगलीकर शरद पवारांच्याच दरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 05:36 PM2019-11-23T17:36:56+5:302019-11-23T18:25:05+5:30
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोक शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांनी ज्यापद्धतीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते याबाबत प्रचंड नाराज आहेत.
सांगली : राज्यातील अनाकलनीय सत्तानाट्याने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली असून अशा परिस्थितीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ठाम असल्याचे मत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे अजित पवारांच्या कृत्याबद्दल काहींनी संतापही व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारत क्रमांक एकचा पक्ष म्हणून यश मिळविले. त्यामुळे येथील राष्ट्रवादी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांनी राज्यातील सत्तानाट्यात बंडाची भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते हादरुन गेले, मात्र या घडामोडीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पर्यायाने शरद पवारांशी आपण बांधिल असल्याची भूमिका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत राष्ट्रवादी एकसंध असल्याचे दिसून आले. दुसरीकडे अजित पवारांच्या भूमिकेविषयी जिल्ह्यातून नाराजीचा सूर उमटत आहेत. त्यांच्या कृतीला गद्दारी म्हणूनही संबोधले आहे.
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोक शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांनी ज्यापद्धतीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते याबाबत प्रचंड नाराज आहेत. आम्ही कधीच शरद पवारांच्या भूमिकेशी प्रतारणा करू शकत नाही. अजित पवारांच्या भूमिकेने राज्यातील राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.
आमदारही शरद पवारांसोबत
जिल्ह्यातील तिन्ही आमदार शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी जयंत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले. आ. सुमनताई पाटील यांनीही शरद पवारांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्या शनिवारी सायंकाळी मुंबईतील बैठकीला उपस्थित होत्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही शरद पवारांसोबतच असल्याने जिल्ह्यातील आमदार एकसंधपणे शरद पवारांशी बांधिल असल्याचे दिसत आहेत.
राष्ट्रवादी कार्यकर्ते हादरले
राज्यात राष्ट्रवादीच्या यशाचा आनंद अजूनही साजरा होत असतानाच अजित पवारांच्या बंडाळीने पक्षाचे कार्यकर्ते हादरुन गेले. सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी बजावणार असल्याने गेल्या दोन दिवसांपासून येथील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाची तयारी केली होती. अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे व अजित पवारांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला. तरीही या परिस्थितीत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय येथील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.