खड्ड्यांद्वारे वैद्यकीय व्यवसायास चालना दिल्याबद्दल महापालिकेचे आभार, मिरजेत अभिनव आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:25 IST2022-11-03T14:25:19+5:302022-11-03T14:25:50+5:30
शहर सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली अमाप पैसा खर्च होत आहे. परंतु रस्त्यांची मोठी दुरावस्था.

खड्ड्यांद्वारे वैद्यकीय व्यवसायास चालना दिल्याबद्दल महापालिकेचे आभार, मिरजेत अभिनव आंदोलन
मिरज: सांगली जिल्ह्यात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खराब रस्त्यामुळे अपघात होवून अनेकजण आयुष्यभरासाठी अदू झाले आहेत. यासर्व घटनेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. संतप्त नागरिकांनी याबाबत महापालिकेविरोधात लोक अभियानाच्यावतीने अभिनव आंदोलन करत शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो काढून महानगरपालिकेच्या आवारात त्याचे प्रदर्शन भरवले.
मिरज शहरात मार्केट परिसर, गाढवे चौक, पोलीस स्टेशन, सराफ कट्टा, मंगळवार पेठ किल्ला भाग, ब्राह्मणपुरी, वखारभाग, नदीवेस, पाटील गल्ली, सोमवार पेठ, कमान वेस, वाळवे गल्ली, विजापूर वेस, दिंडी वेस येथील फोटो काढून महानगरपालिकेच्या आवारात गेटवर, दरवाजावर, हे फोटो चिटकवण्यात आले आहेत.
मिरजेतील खड्ड्यांच्या प्रदर्शनात सहर्ष स्वागत. खड्ड्यांद्वारे वैद्यकीय व्यवसाय चालना दिल्याबद्दल महापालिकेचे आभार. महापालिकेच्या खड्ड्यांची लवकरच विश्वविक्रमासाठी नोंद असे आशयाचे मजकूर लिहिले होते. लोक अभियनाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात हे फोटो चिटकवण्यासाठी प्रवेश केला असता प्रशासनाने दरवाजे बंद केले. प्रशासनाने आडवणुक केली असता कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला.
लोक अभियानच्यावतीने तीन महिन्यापूर्वी स्वखर्चाने शहरातील खड्डे भरून घेतले होते. शहर सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली अमाप पैसा खर्च होत आहे. परंतु रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त न केल्यास अधिकारी नगरसेवकांच्या गाडी अडवून त्यांना खड्ड्यात बसवून फोटो काढले जातील असा इशारा लोक अभियानाचे निमंत्रक ओमकार शुक्ल यांनी दिला. यावेळी लोक अभियानाचे निमंत्रण सी.जी कुलकर्णी, निलेश साठे, विजय राठी, अनिल हंबर, सुरज डवरी, महेश नाईक, अभिषेक म्हेत्रे उपस्थित होते.