संतप्त धरणग्रस्त आंदोलक घुसले इस्लामपूर तहसील कार्यालयात, पोलिसांची उडाली तारांबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:25 PM2023-01-17T15:25:00+5:302023-01-17T15:30:09+5:30

'ही जनता मालक म्हणून इथे येऊन न्यायासाठी बसली आहे प्रशासन जनतेसाठी चालते हे लक्षात ठेवा'

Angry dam affected protesters entered Islampur Tehsil office | संतप्त धरणग्रस्त आंदोलक घुसले इस्लामपूर तहसील कार्यालयात, पोलिसांची उडाली तारांबळ 

संतप्त धरणग्रस्त आंदोलक घुसले इस्लामपूर तहसील कार्यालयात, पोलिसांची उडाली तारांबळ 

युनूस शेख

इस्लामपूर : गेल्या ४० वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी १६१ मोर्चे काढून अनेक आंदोलने करणाऱ्या वारणा धरणग्रस्त आणि चांदोली प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी आज दुसऱ्या दिवशी थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. आंदोलकांच्या गर्दीने तळमजला पूर्ण भरून गेला होता. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोमवारी थकीत कबजेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर भर उन्हात बसून आंदोलन केले. सायंकाळपर्यंत यावर अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. याचवेळी नायकवडी यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर करत प्रशासनाला जागे केले होते.

आज, मंगळवारी सर्व आंदोलक पुन्हा तहसील कार्यालयासमोर एकत्र जमले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी आंदोलनाला सुरुवात करताना पुन्हा महिलांनी संघर्ष गाणी गात वातावरण तापवले यातच उन्हाचा चटका तीव्र होऊ लागल्याने प्रशासन लक्ष देत नाही तर आत घुसण्याचा गनिमी कावा यशस्वी करत तहसील कार्यालयातील तळ मजल्यावर ठिय्या मारत ताबा घेतला.

माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, विक्रम पाटील,संतोष घनवट यांनी आंदोलस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. खोत म्हणाले, सरकार कधी सावकार होऊ शकत नाही मात्र महाविकास आघाडीचे सरकारने १२ टक्के व्याजासह या नोटीसा पाठवून अन्याय केला आहे. सरकार असले काय आणि नसले काय, मला फरक पडत नाही. सरकार कुणाचेही असुदे. या न्याय मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अन्यथा त्या अधिकाऱ्यांना इथे ठेवणार नाही. ही जनता मालक म्हणून इथे येऊन न्यायासाठी बसली आहे प्रशासन जनतेसाठी चालते हे लक्षात ठेवा. आंदोलकांना न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू.

सम्राट महाडिक म्हणाले, फडणवीस सरकारचा शासन निर्णय रद्द करून महाघोटाळे सरकारने नवीन निर्णय घेत या अन्यायी नोटीसा पाठवल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शक्य त्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा त्यांना बाहेर पडू देणार नाही.

विक्रम पाटील म्हणाले, भूसंपादन अधिकारी लाटकर हे मनमानी कारभार करत आहेत. धरणग्रस्तांना तुच्छतेची वागणूक देतात.त्यांच्यावर कारवाई करावी. फडणवीस सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करून या आंदोलकांना न्याय द्यावा. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला होता.

..अन्यथा कारवाई करावी लागेल

आंदोलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना गोंधळ उडाला. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Angry dam affected protesters entered Islampur Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.