कासेगाव पोलिसांबाबत परिसरातून संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:18+5:302021-05-27T04:28:18+5:30
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील सर्वसामान्यांना त्रास देऊन अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांवर का कारवाई ...
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील सर्वसामान्यांना त्रास देऊन अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांवर का कारवाई होत नाही, वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी का घालत आहेत, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’कडे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना याबाबत निवेदन दिले आहे. लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या अमर जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे, अन्यथा मानवाधिकार संघटना आंदोलन छेडणार आहे. अमर जाधव हा काय पोलिसांचा ‘डॉन’ आहे का? पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गावातच चालू असलेला त्याचा कारभार अशोभनीय आहे.
- शशिकांत वाटेगावकर, राज्य उपाध्यक्ष, मानवाधिकार संघटना.
काही दिवसांपूर्वी अमर जाधव, विनय कारंजकर या दोन पोलिसांनी माझी काही चूक नसताना अर्वाच्च शिवीगाळ केली होती. याबाबत कृष्णात पिंगळे यांना भेटून तोंडी तक्रार केली. पुरावेही दिले होते. गावातील अनेक लोकांशी यांचे वाद झाले आहेत. त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे.
- विनोद तोडकर,
अध्यक्ष, कासेगाव व्यापारी असोसिएशन
मारहाण करण्याचा अधिकार या पोलिसांना कोणी दिला? हे पोलीस अधिकाराचा गैरवापर करीत आहेत. ते सर्वसामान्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ यांच्यावर कारवाई करावी. त्यांना पाठीशी घालू नये.
- अनिल माने,
अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना
पोलिसांची कासेगाव येथील नागरिकांसोबतची वागणूक अतिशय निंदनीय आहे. अरेरावीची भाषा, दमदाटी, मुजोरपणा दाखविणाऱ्या काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होत आहे. खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना बडतर्फ केले पाहिजे.
- ॲड. संदीप पाटील
शेतात चाललो असताना अमर जाधव या पोलिसाने माझ्या दुचाकीची हवा सोडली. गावात यापूर्वी असे कधीच झालेले नाही. पोलीस यंत्रणा व नागरिक यांच्यात चांगले नाते निर्माण झाले पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी न घालता कारवाई करावी.
- प्रभाकर पाटील,
माजी अध्यक्ष,
वाळवा बझार
शेतात जातानाही आता भीती वाटू लागली आहे. नियमांचे पालन करूनही हे पोलीस नाहक त्रास देऊ लागले आहेत.
- संजय पाटील,
उपाध्यक्ष, वाळवा तालुका भाजप
पोलीस गावातील लोकांना अरेरावीची भाषा करीत असतील व तक्रार होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर या पोलिसांना नक्की कोणाचा आशीर्वाद आहे, हे शोधावे लागेल. अर्वाच्च शिवीगाळ, दमदाटी, अरेरावी ही भाषा शोभनीय नाही.
- अभिजित तोडकर,
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी, कासेगाव