कासेगाव पोलिसांच्या शिवीगाळप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:42+5:302021-05-25T04:30:42+5:30
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील कोरोना योद्ध्याला पोलिसांकडून झालेल्या अर्वाच्च शिवीगाळ व दमदाटी प्रकाराबद्दल नागरिकांतून संतप्त ...
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील कोरोना योद्ध्याला पोलिसांकडून झालेल्या अर्वाच्च शिवीगाळ व दमदाटी प्रकाराबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्यांना नाहक त्रास देणाऱ्या 'त्या' कथित अमर, अकबर, अँथोनीवर जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावातील विविध संघटनांचे प्रतिनिधी पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
पालकमंत्री जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावमध्ये काही पोलिसांनी संचारबंदीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता अर्वाच्च शिवीगाळ, दमदाटी केली जात आहे. प्रतिष्ठित व वयोवृद्धांनाही हे पोलीस अरे-तुरे करून अंगावर जाण्यास मागेपुढे बघत नाहीत. शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनाही विनाकारण पोलीस ठाण्यात ८-१० तास थांबवून घेतले जात आहे. त्यामुळे कासेगाव पोलिसांच्या कार्यपध्दतीबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.
रविवारी शिराळा येथे कोरोना रुग्णांना उकडलेली अंडी देण्यासाठी निघालेल्या बँकेच्या अधिकाऱ्यास नाहक त्रास देऊन त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. कासेगाव पोलिसांकडून झालेल्या या प्रकाराबद्दल गावातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी पालकमंत्री जयंत पाटील व आमदार नाईक यांना भेटून निवेदन देणार आहेत.