Sangli: वेतनासाठी ‘वॉन्लेस’च्या संतप्त कामगारांनी संचालकांना डांबले, पोलिसांच्या मध्यस्थीने तब्बल १२ तासानंतर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:02 PM2023-09-29T15:02:18+5:302023-09-29T15:02:31+5:30
आर्थिक अडचणींमुळे तमिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज या संस्थेकडे मिशन हॉस्पिटलचे हस्तांतरणाच्या हालचाली
मिरज : मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाच्या संतप्त कामगारांनी वेतनाच्या मागणीसाठी संचालक डॉ. प्रभा कुरेशी यांना तब्बल १२ तास घेराव घालून प्रयोगशाळेत डांबले. रात्री पोलिसांनी हस्तक्षेप करून डॉ. कुरेशी यांची सुटका केली.
मिरजेतील सुमारे १३० वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वॉन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे रुग्णालयातील पाचशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे. गेले दोन वर्षे पगार नसल्याने रुग्णालय कर्मचारी हवालदिल आहेत. थकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज व पाणीपुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलकडे वॉन्लेस रुग्णालयाच्या हस्तांतरणाबाबत चाचपणी सुरू आहे.
गेली दोन वर्षे संचालक डॉ. प्रभा कुरेशी कामगारांना भेटत नसल्याची तक्रार आहे. बुधवारी सकाळी विद्यापीठाच्या पथकाकडून रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी डॉ. प्रभा कुरेशी या रुग्णालयात आल्या होत्या. डॉ. कुरेशी रुग्णालयात आल्याचे समजताच कामगारांनी तेथे जाऊन त्यांना वेतन कधी मिळणार याचा जाब विचारला. मात्र डॉ. कुरेशी समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने कामगारांनी आक्रमक पावित्रा घेत त्यांना घेराव घालत प्रयोगशाळेतून बाहेर सोडले नाही.
रात्री नऊ वाजेपर्यंतही कर्मचाऱ्यांनी डॉ. कुरेशी यांना बाहेर सोडले नसल्याने शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मध्यस्थीने पुढील महिन्यात कामगारांना वेतन देण्याचे डॉ. कुरेशी यांनी मान्य केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
कामगारांची समजूत काढली
संचालिका डॉ. कुरेशी यांनी पगाराबाबत लेखी आश्वासन देण्याची कामगारांची मागणी होती. त्यानुसार डाॅ. कुरेशी यांनी पुढील आठवड्यात काही प्रमाणात वेतन देण्याचे मान्य केले. त्यानंतर कामगारांची समजूत घालून त्यांची सुटका केल्याचे पोलिस निरिक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
हस्तांतरणाच्या हालचाली
दीडशे वर्षांची वैद्यकीय व्यवसायाची परंपरा असलेल्या मिरजेत अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये वॉन्लेस (मिशन) रुग्णालयाची स्थापना करून आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा प्रारंभ केला. सुमारे एक शतक मिशनचा राज्यात व देशातही लौकिक होता. मात्र गतवर्षापासून आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या ऐतिहासिक मिशन हॉस्पिटलचे अस्तित्व धोक्यात असल्याने तमिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज या संस्थेकडे मिशन हॉस्पिटलचे हस्तांतरणाच्या हालचाली सुरू आहेत.