अनिकेत कोथळे खून प्रकरण: मारहाणीत किडनी, हृदयाला झालेल्या जखमामुळेच मृत्यू, डॉक्टरांची महत्त्वपूर्ण साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:27 PM2023-04-20T13:27:42+5:302023-04-20T13:28:07+5:30
अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली
सांगली : अनिकेत कोथळे याच्या फुप्फुस आणि किडनीसह इतर अवयवांना जखमा झाल्या होत्या. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची महत्त्वपूर्ण साक्ष डॉ. वैभव सोनार यांनी बुधवारी न्यायालयासमोर दिली. प्लास्टिकच्या काठीने मारल्यानेही मृत्यूची शक्यता असते, असेही डॉ. सोनार यांनी सांगितले.
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतील मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. या खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. मारहाणीतील मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न संशयितांनी केला होता. या अर्धवट जळालेल्या त्याच्या अवयवाचे विच्छेदन डॉ. वैभव सोनार यांनी केले होते. त्यामुळे त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेत डॉ. सोनार यांच्याकडून अनिकेतच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले. यापूर्वी नोंदविलेली त्यांची साक्ष कायम ठेवत अवयवांवर झालेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
सरतपास झाल्यानंतर बचाव पक्षातर्फे ॲड. प्रमोद सुतार, ॲड. विकास पाटील आणि ॲड. गिरीष तपकिरे यांनी डॉ. सोनार यांना प्रश्न विचारले. सोनार यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नावर ॲड. निकम यांनी आक्षेप घेतल्याने दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
१९ मेपासून पुढील सुनावणी
अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून, आता पुढील सुनावणी १९ आणि २० मे रोजी होणार आहे. त्यावेळी या प्रकरणाचे प्रमुख तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची साक्ष होणार आहे.