अनिकेत कोथळे खूनप्रकरण: पोलिस निरीक्षक राजन माने यांचा उलटतपास पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:39 PM2023-04-19T12:39:58+5:302023-04-19T12:40:25+5:30
कोठडीत असताना मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता
सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतील मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची नियमित सुनावणी मंगळवारपासून सुरू झाली. या खटल्यातील फिर्यादी आणि तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजन माने यांचा उलटतपास बचाव पक्षाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. उलटतपासात माने यांना सर्व बाजूंनी प्रश्न विचारण्यात आले.
सांगली शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून कोथळेसह अन्य एकाला ताब्यात घेतले होते. कोठडीत असताना दोघांना मारहाण करण्यात आली होती. यात कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्य संशयित बडतर्फ पालिस उपनिरीक्षक युवराज कामटे, अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदींच्या विरोधात खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील अन्य एक संशयित अरुण टोणे याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे.
या खटल्यात फिर्यादी असलेल्या पोलिस निरीक्षक माने यांची साक्ष अधिक महत्त्वाची आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांचा सरतपास पूर्ण केला आहे. त्यावेळी माने यांनी घटनेतील घटनाक्रम आणि संशयितांचे कृत्य याबाबत सविस्तर माहिती न्यायालयात दिली आहे. आता उलटतपास बचाव पक्षाच्या वतीने वकील ॲड. गिरीश तपकिरे यांनी मंगळवारी पूर्ण केला. आज, बुधवारीही या खटल्याच्या सुनावणीचे कामकाज चालणार आहे.