अनिकेत कोथळे खून खटला: तत्कालीन उपअधीक्षकांचा उलटतपास पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 01:29 PM2022-10-18T13:29:34+5:302022-10-18T13:29:58+5:30
या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. आजपासून सुनावणीला सुरुवात झाली.
सांगली : अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीस सोमवारपासून सुरुवात झाली. गत सुनावणीवेळी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांचा सरतपास घेण्यात आला होता. सोमवारी बचाव पक्षाकडून उलटतपास पूर्ण करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फेरतपास घेतला.
थर्ड डिग्रीचा अवलंब करून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. या घटनेने राज्याच्या पोलीस दलाला हादरा बसला होता. या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. आजपासून सुनावणीला सुरुवात झाली.
या खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झालेला आहे. गेल्या सुनावणीत तत्कालीन उपअधीक्षक धीरज पाटील यांची साक्ष नोंदवली. अनिकेत कोथळे खून खटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनिल लाड याची चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान साऱ्या खुनाचा उलगडा झाला.
घटनास्थळ, महादेवगड डोंगर येथे मृतदेह जाळलेले ठिकाणही दाखविल्याची साक्ष नोंदविल्याचे त्यांनी सरतपासात सांगितले होते. त्यानंतर आज बचाव पक्षाने उलटतपास घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले पत्र, वाहन नोंदी याविषयी विचारण्यात आले. यावेळी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. साक्षीदार पाटील यांचा बचाव पक्षाचे ॲड. विकास पाटील-शिरगावकर, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलटतपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.