अनिकेत कोथळे प्रकरण ठाणे अंमलदारासह सात पोलिस निलंबित: सांगली पोलिसप्रमुखांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 07:39 PM2017-11-11T19:39:17+5:302017-11-11T19:41:15+5:30
सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले.
सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. या सर्वांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत.
ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, पोलिस कोठडीचे गार्डप्रमुख प्रदीप रामचंद्र जाधव, श्रीकांत सुरेश बुलबुले, ज्योती चंद्रकांत वाजे, स्वरूपा संतोष पाटील, वायरलेस आॅपरेटर सुभद्रा विठ्ठल साबळे व गजानन जगन्नाथ व्हावळ अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १२ पोलिस निलंबित झाले आहेत. आणखी काहीजणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. एकाच प्रकरणात १२ पोलिस निलंबित होण्याची जिल्'ातील ही पहिलीच कारवाई आहे.
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना गेल्या सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व ‘झिरो’ पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांना माहीत होते. कामटेच्या पथकाने सर्वांसमोर अनिकेतचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या बेकर मोबाईल गाडीतून नेला होता. वास्तविक ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, वायरलेस आॅपरेटर, कोठडीबाहेर गार्ड म्हणून ड्युटी करणाºया कर्मचाºयांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाºयांना द्यायला हवी होती; पण ते गप्प बसले.
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी घटनेदिवशी नेमके काय घडले, ड्युटीवर कोण होते, याची चौकशी करून माहिती घेतली. ठाणे अंमलदार शिंदेसह सातजणांनी कर्तव्यात कसूर केल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे शुक्रवारी रात्री या सर्वांना बोलावून घेऊन निलंबित केल्याची माहिती दिली. कर्तव्यात कसूर, बेशिस्त, बेजबाबदारपणा व पोलिस दलास अशोभनीय असे त्यांचे वर्तन असल्याचा ठपका पोलिसप्रमुखांनी ठेवला आहे.
‘सीआयडी’कडून चौकशी
निलंबित ठाणे अंमलदार मिलिंद शिंदेसह सातही पोलिस ‘सीआयडी’ चौकशीच्या भोवºयात अडकले आहेत. निलंबित होऊनही ते शनिवारी दिवसभर पोलिस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलजवळ बसून होते. अनिकेत कोथळेचे मृत्यू प्रकरण अंगलट आल्याचे त्यांच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत होते. सीआयडीचे पथक कृष्णा मॅरेज हॉलसमोरील कॉन्फरन्स हॉलमध्ये कामटेसह सर्व आरोपींची चौकशी करीत होते. सीआयडीकडून निलंबित झालेल्या पोलिसांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.