अनिकेत कोथळे खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:15+5:302020-12-22T04:26:15+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित ठेवण्यात आलेल्या सर्वच प्रकारच्या न्यायालयीन सुनावण्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ...
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित ठेवण्यात आलेल्या सर्वच प्रकारच्या न्यायालयीन सुनावण्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना कालावधित खंडित झालेली बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. सोमवारी विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम आणि बचाव पक्षाच्या वकिलांच्या उपस्थितीत दि. १८ ते २१ जानेवारीदरम्यान सलग सुनावणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.
पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले या संशयितांविरोधात खटला सुरू आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतच झालेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन तो जाळण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा होती. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुनावण्या स्थगित होत्या. आता पुन्हा न्यायालयीन कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रमुख खटल्यांच्याही सुनावण्या हाेणार आहेत. त्यानुसार पुढील महिन्यात सलग चार दिवस या खटल्याची सुनावणी हाेणार आहे.