अनिकेत कोथळेचा खून कट रचून-- कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...पुढील महिन्यात सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:00 AM2019-02-06T00:00:37+5:302019-02-06T00:01:12+5:30
लूटमारीच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत कोथळे याचा खून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी कट रचून केला आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी
सांगली : लूटमारीच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत कोथळे याचा खून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी कट रचून केला आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात ठेवला. यासह आणखी दहा आरोप संशयितांविरुद्ध ठेवण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील सुनावणी निश्चित केली जाणार आहे.
सांगली शहर पोलिसांनी लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेतचा मृत्यू आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसिरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ड्युटीवरील आठ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. सध्या सर्वजण कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे.
कामटेसह सहाजणांविरुद्ध १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले होते. कामटेने रचलेल्या कटानुसार अनिकेत व अमोल भंडारेला अटक करण्यात आली. अनिकेतकडून अन्य गुन्हे जबरदस्तीने कबूल करून घेण्यासाठी त्यास बेदम मारहाण करुन त्याचा खून केला.
या गुन्ह्यात शिक्षा होणार असल्याचे माहीत असूनही त्यांनी अनिकेत व अमोल कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचून खोटी माहिती समोर आणली. आंबोलीतील महादेवगड येथे अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करणे, पुरावा नष्ट करणे, अनिकेतला मारहाण करून गंभीर दुखापती करणे, गुन्ह्याची माहिती वरिष्ठांपासून लपविणे, अनिकेत पळून गेल्याचा बनाव करणे, साक्षीदार अमोल भंडारेला मारहाण, अनिकेतचा शारीरिक छळ करून अपमान, हे आरोप अॅड. निकम यांनी ठेवले आहेत.
मुख्य साक्षीदार अमोल भंडारे याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली, असेही आरोपात म्हटले आहे. त्यावर बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे सादर होणार असून त्यानंतर पुढील सुनावणीवर आदेश दिले जाणार आहेत.
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी आता पुढील महिन्यात सुनावणी आहे. अॅड. निकम यांनी ठेवलेल्या आरोपांवर बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालय सुनावणीची तारीख निश्चित करणार आहे. त्यानंतर या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होणार आहे. संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे यास गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.