अनिल लाडच्या चौकशीतून कोथळे खुनाचा उलगडा, उपअधीक्षक पाटील यांची साक्ष
By शीतल पाटील | Published: September 12, 2022 09:09 PM2022-09-12T21:09:44+5:302022-09-12T21:12:11+5:30
चौकशीत घटनास्थळ, मृतदेह दाखवला
सांगली : अनिकेत कोथळे खून प्रकरणात अनिल लाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या चौकशीतून खुनाचा उलगडा झाला. त्याने अनिकेतला जाळलेले ठिकाणही दाखविल्याची साक्ष तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सोमवारी न्यायालयात दिली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतला.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. खुनानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळण्यात आला होता. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झाला आहे.
सोमवारी तत्कालीन उपअधीक्षक धीरज पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली. ते म्हणाले, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार निरीक्षक राजन माने यांच्याकडून तपास हाती घेतला. त्यावेळी संशयित अनिल लाड याला समक्ष हजर केले. गुन्ह्याविषयी चौकशी करून पंचांसमक्ष अटक केली. राजन माने यांना उर्वरित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. लाड याला गुन्ह्यासंदर्भात विश्वासात घेऊन माहिती घेतली. त्यावेळी त्याने कोथळे याचा मृतदेह चारचाकीमधून महादेवगड डोंगरात नेला व त्याठिकाणी मृतदेह जाळल्याचे सांगितले. त्यानुसार घटनास्थळी पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला.
साक्षीदार पाटील यांचा ॲड. निकम यांनी सरतपास घेतल्यावर बचाव पक्षाचे ॲड. विकास पाटील-शिरगावकर, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलट तपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.