अनिलभाऊ, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उंबरठे अंधारात का झिजवताय?

By admin | Published: June 24, 2016 12:13 AM2016-06-24T00:13:23+5:302016-06-24T00:49:01+5:30

वैभव पाटील : आमदारांवर टीका; आम्ही जनतेला न्याय देतो

Anilbhau, Congress-NCP's horoscope darkened? | अनिलभाऊ, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उंबरठे अंधारात का झिजवताय?

अनिलभाऊ, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उंबरठे अंधारात का झिजवताय?

Next

विटा : खानापूर मतदारसंघात विद्यमान आमदारांकडून न्याय मिळत नसल्याने लोक आमच्याकडे येत आहेत. आम्ही पक्ष न पाहता खासदारांच्या माध्यमातून शासनदरबारी जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही एवढे कार्यतत्पर असल्याचे ऊर बडवून सांगताय, मग तालुक्यात लोक आमच्याकडे का येतात? तुम्ही कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या घराचे उंबरठे अंधारात का झिजवताय, असा प्रतिटोला नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला.
नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून आमदार विट्यात फंड खर्च करीत आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी बहुतांशी आमदार फंड दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खर्च केला होता. मात्र दोन्ही तालुक्यांना न्याय देण्याऐवजी सध्याचे आमदार नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विटा शहरात फंड खर्च करतात.
टेंभूसाठी शासनाकडून कोणी किती निधी मिळविला, हे जनतेला माहिती आहे. आतापर्यंत टेंभूसाठी विद्यमान आमदारांनी बारा वर्षांत तीनशे कोटी, तर सदाशिवराव पाटील यांनी दहा वर्षात अकराशे एक कोटीचा निधी मिळविला आहे. विटा पारिसरातील शेतकऱ्यांचा कळवळा आताच का तुम्हाला आला आहे? एवढा कळवळा होता, तर कालच्या दुष्काळी परिस्थितीत तुम्ही काय केले ते जनतेला सांगावे. मतदारसंघात जनावरांसाठी एकही चारा छावणी तुम्ही सुरू करू शकला नाही. दहशत व धमक्यांची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुनी व गुळगुळीत झालेली टेप बंद करावी. लोक एकदा फसतात, वारंवार फसतील एवढे लोकांना दूधखुळे समजू नका. गुंडगिरी कोण करते, हे समजण्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाचा आधार घेतला आहे, एवढे बघितले तरी पुरे आहे, अशी टीका नगराध्यक्ष पाटील यांनी केली. (वार्ताहर)


कामाचा निधी वळवणे हा खुजेपणाच...
विटा नगरपालिकेला ८ मार्च रोजी दीड कोटींचे रस्ते अनुदान मिळाले होते. त्यापैकी एक कोटींचे विशेष रस्ते अनुदान होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. खासदार संजय पाटील यांनी शिफारस केली होती. त्यानंतर २८ मार्चला हा एक कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा आदेश आला. कॉँग्रेसच्या नेत्यांना निधी देताय, असे सांगून आमदारांनी निधी वळवण्यास सांगितले. त्यानंतर मी आणि खासदार पाटील मुख्यमंत्र्यांना भेटलो. १६ मे रोजी विट्याची कार्यान्वित यंत्रणा बदलून नगरपालिका ही कामे करणार असल्याबाबतचा आदेश निघाला. त्यानुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले. मात्र आमदारांनी उध्दव ठाकरे यांना भेटून मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यात आल्याने हा निधी तिकडे वर्ग झाला. आम्ही प्रयत्न केलेल्या कामाचा निधी यंत्रणा बदलून वळवणे हा खुजेपणा आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

Web Title: Anilbhau, Congress-NCP's horoscope darkened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.