चाऱ्यासाठी पशुधनाचा हंबरडा..!
By admin | Published: April 26, 2016 11:50 PM2016-04-26T23:50:15+5:302016-04-27T00:44:32+5:30
टंचाईची तीव्रता वाढली : लाल फितीत अडकला छावण्यांचा प्रस्ताव
सांगली : जिल्ह्यातील ७३४ गावांपैकी १३१ गावे आणि ९४९ वाड्या-वस्त्यांवरील ३ लाख १३ हजार २१२ नागरिक दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. लाखो पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असून, चाऱ्यासाठी उजाड माळरानावर पशुधन हंबरडा फोडत असूनही, त्यांची हाक शासन आणि राज्य सरकारपर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. प्रशासकीय लाल फितीत चारा छावण्यांचे प्रस्ताव अकडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मुक्या जनावरांना जगवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. सध्या विहिरी, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषत: जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व तालुक्यातील पशुधनासाठी शेतकऱ्यांकडे चाराच उपलब्ध नाही. शेतकरी उघड्या माळावर पशुधन सोडून देत आहेत. पशुधन चाऱ्याचा शोध घेत हंबरडा फोडत आहेत. पण, या मुक्या पशुधनाचा हंबरडा राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनापर्यंत अजूनही पोहोचलेला नाही. म्हणूनच शासनाने पशुधनाच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू कराव्यात अथवा थेट चाऱ्याचे वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
जत तालुक्यातील पाच गावांसाठी तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी झाली आहे. याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल असूनही त्याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय अद्याप झाला नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. येत्या दोन दिवसात छावण्यांबाबत निर्णय होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. चारा छावणी सम्राटांना पोसण्यापेक्षा चारा डेपो करून शेतकऱ्यांना थेट चारा देण्याचीही मागणी होत आहे. यापैकी कोणताही निर्णय घ्या आणि पशुधनासाठी चारा त्वरित देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. प्रशासनाने पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली नाही, तर उपाशीपोटी पशुधनाचा बळी जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोठ्या पशुधनाबरोबर शेळ्या, मेंढ्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न सोडवावा, अशी शेतकरी मागणी करीत आहेत.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
जतमधील तीन प्रस्तावांना मंजुरी मिळणार
जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाच गावांनी तीन ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होती. परंतु, या बैठकीत काय निर्णय झाला, याची आमदार आणि जिल्हा प्रशासनाला कोणतीच कल्पना नाही. येत्या दोन दिवसात शासनाकडून रितसर आदेश आल्यानंतरच चारा छावण्या सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात चारा छावण्या त्वरित सुरु होतील, अशी फारशी अपेक्षा दिसत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
सव्वातीन लाख जनतेला टँकरने पाणी
जिल्ह्यातील १२२ गावे आणि ९४६ वाड्या-वस्त्यांवरील तीन लाख १३ हजार २१२ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून येथील जनतेला १२८ खासगी आणि सात शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. येथील नागरिकांना टँकरनेही वेळेवर आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या जत, तासगाव तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.