जनावरांच्या खाद्याचे दर गगनाला भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:06 AM2019-08-22T00:06:44+5:302019-08-22T00:06:48+5:30
अतुल जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क देवराष्ट्रे : दररोजच्या पशुआहारात लागणाऱ्या सरकी पेंडेच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. बाजारात सरकी ...
अतुल जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देवराष्ट्रे : दररोजच्या पशुआहारात लागणाऱ्या सरकी पेंडेच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. बाजारात सरकी पेंडीचे भाव प्रतिटन ३६ हजाराच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे या दरवाढीने दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. मका व सरकीच्या दराचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे.
सरकीचे भाव वाढल्यानेच कापसाला झळाळी आली आहे. पण, सरकीचे भाव अचानक वाढण्यामागे अमेरिकेतील मका पीक हे मुख्य कारण आहे. म्हणून सरकीच्या ढेपीच्या भावात वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मक्याचे १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असलेले भाव २ हजार २०० रुपयांवर पोहोचले. तसेच सरकी ढेपीची मागणी वाढल्याने सरकीचे दरही वाढले आहेत. मका मिळत नसल्याने सर्वच पशुखाद्य महागले आहे. बाजारात सरकी पेंडीबरोबर इतर पशुखाद्यातही मोठी वाढ झाली आहे. गोळी १६५० रुपये, भुसा १०५० रुपये, खपरी २०००, मकाचुणी १४०० रुपये असा दर आहे. अचानकच मोठ्या प्रमाणात पशुखाद्य महागल्याने दूध उत्पादकांसमोर दुभत्या जनावरांबरोबरच भाकड जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे.
चारा टंचाईचे संकट
ऐन दूध टंचाईच्या काळात चाराटंचाईने डोके वर काढले आहे. दुधाला योग्य भाव मिळत नसताना, पशुखाद्याबरोबर चाराही महाग झाला आहे. महाग असूनही, तो मिळत नाही. ऊस, कडबा, मका यासह सर्वच चारा महाग झाला आहे. हा चाराही मिळेनासा झाला आहे. दूध व्यवसायात मंदी व खाद्य, चाराच्या प्रचंड टंचाईने दूध व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. वाढलेल्या खाद्यदराने दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.