प्राणीमित्राने दिले घोणसला जीवदान, निर्जन ठिकाणी सोडले सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:07 PM2020-06-23T16:07:10+5:302020-06-23T16:34:32+5:30
घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले.
सांगली : घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले.
घन:शामनगर येथील एका कुटुंबाला त्यांच्या घराच्या परिसरात साप दिसल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र सूरज शिंदे यांना बोलावून घेतले. शिंदे यांनी या साडेतीन फुटाच्या घोणस सापास अगदी सुरक्षित पकडून शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी सोडून दिले.
सूरज शिंदे म्हणाले, घोणस साप भारतात कुठेही आणि सहज दिसत आहेत. घोणसचे विष अतिशय जहाल असते. त्याचे विष व्हॅस्कुलोटॉक्सी प्रकारचे आहे. घोणस सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात.
या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे तो विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात.